अझरबैजानने आर्मेनियाच्या सैनिकांचा केला शिरच्छेद

Armenia Azerbaijan War आर्मेनिया-अझरबैजान लढाईत ६०० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.

Armenia Azerbaijan War
अझरबैजानने आर्मेनियाच्या सैनिकांचा केला शिरच्छेद 

थोडं पण कामाचं

  • अझरबैजानने आर्मेनियाच्या सैनिकांचा केला शिरच्छेद
  • आर्मेनिया-अझरबैजान लढाईत ६००पेक्षा जास्त ठार
  • दोन्ही देशांचे एकमेकांच्या नागरी वस्त्यांवर हल्ले केल्याचे आरोप

नवी दिल्ली: एके काळी सोविएत रशियाचा (Union of Soviet Socialist Republics - USSR) भाग असलेल्या आर्मेनिया (Armenia) आणि अझरबैजान (Azerbaijan) यांच्यातील लढाईत ६०० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. आर्मेनियाने अझरबैजानवर आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करुन पकडलेल्या सैनिकांचा शिरच्छेद केल्याचा आरोप केला आहे. रशियाच्या मध्यस्थीनंतर झालेली युद्धबंदी मोडून दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले आहेत. आर्मेनियाने अझरबैजानवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा तसेच नागरी वस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्याचा आरोप केला आहे. अझरबैजानने आर्मेनियावर युद्धबंदी मोडून वारंवार हल्ले करत असल्याचा आरोप केला आहे. 

अझरबैजानकडून लढाईत अनेक दहशतवादी सहभागी झाले आहेत. हे दहशतवादी अझरबैजानच्या लष्करी गणवेषाचा वापर करत आहेत. लढाई दरम्यान पकडल्या गेलेल्या काही आर्मेनियाच्या सैनिकांचा दहशतवाद्यांनीच शिरच्छेद केला आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग आहे. लष्करी गणवेषाचा गैरवापर सुरू आहे, असा आरोप आर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. काही दिवसांपूर्वी अझरबैजानकडून आयसिसचे दहशतवादी लढत असल्याचे वृत्त आले होते. यानंतर आर्मेनियाने अझरबैजानवर गंभीर आरोप केला आहे.

आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील लढाईत युद्धबंदी झाल्यानंतरही अधूनमधून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमध्ये दोन्ही देशांच्या नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. आर्मेनियाच्या एका क्षेपणास्त्र हल्ल्यात अझरबैजानमधील गांजा शहरात १३ नागरिक ठार आणि ५० नागरिक जखमी झाले. अझरबैजानने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत युद्धात त्यांचे ६० नागरिक ठार झाले असून २७० जखमी झाले आहेत. सैनिकांविषयीची आकडेवारी दोन्ही देशांनी दिलेली नाही. नागोर्नो-काराबाखच्या प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार लढाईत ६०० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. यात दोन्ही बाजूच्या सैनिक आणि नागरिक यांचा समावेश आहे.

आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सैन्याने एकमेकांविरोधात तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर, ड्रोन यांच्या मदतीने हल्ले केले. यामुळे दोन्ही देशांची मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली. आर्मेनियाने अझरबैजानवर क्लस्टर बॉम्बद्वारे हल्ले केल्याचा आरोप केला. अझरबैजानने आर्मेनियावर गॅस पाइप लाइनला लक्ष्य करुन लढाईला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

४ हजार ४०० चौरस किलोमीटरच्या नागोर्नो-काराबाखवरुन वाद

अझरबैजान हा देश कॅस्पिअन समुद्राच्या (Caspian Sea) किनाऱ्यावर आहे. तर आर्मेनिया हा देश अझरबैजानचा शेजारी देश आहे. दोन्ही देशांनी ४ हजार ४०० चौरस किलोमीटर परिसरातील नागोर्नो-काराबाख (Nagorno-Karabakh) या भूभागावर दावा केला आहे. आंतरराष्ट्रीय नकाशानुसार नागोर्नो-काराबाख अझरबैजानच्या हद्दीत आहे, मात्र या भूभागावर सध्या आर्मेनियातील स्थानिक सशस्त्र गटांचा ताबा आहे. याआधी १९९१ मध्ये स्थानिक सशस्त्र गटांनी नागोर्नो-काराबाख अझरबैजान पासून स्वतंत्र झाल्याची आणि आर्मेनियात विलीन झाल्याची घोषणा केली होती. अझरबैजानने स्वातंत्र्याची ही घोषणा फेटाळत नागोर्नो-काराबाख आपलाच भूभाग असल्याचा दावा केला होता. याच मुद्यावरुन दोन्ही देशांमध्ये अधूनमधून संघर्ष होतात. पण यावेळी दोन्ही देश कमालीचे आक्रमक झाले आहेत.

तुर्कस्तानचा अझरबैजानला पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांनी (United Nations - UN) आर्मेनिया आणि अझरबैजानला शांततेचे आवाहन केले आहे. मात्र तुर्कस्तानचा अझरबैजानला चिथावणी देत संघर्ष सुरू ठेवण्याकडे कल दिसत आहे. तुर्कस्तानने (Turkey) अझरबैजानला पाठिंबा देत लष्करी मदत पुरवली आहे. तसेच तुर्कस्तानने आर्मेनियातील नागरिकांना सत्ताधाऱ्यांविरोधात बंड करण्याचे आवाहन केले. आर्मेनियात बाहुले सरकार आहे, हे सरकार जनतेचे हित साधण्यासाठी सक्षम नाही; असे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन (Erdogan) म्हणाले. त्यांनी आर्मेनियातील नागरिकांना सरकारविरोधात उठाव करण्याचे आवाहन केले. संघर्षात अझरबैजानकडून सैनिकांव्यतिरिक्त दहशतवादीही लढल्याची चर्चा आहे. आयसिस आणि पाकिस्तानमधून आलेले काही जण लढाईत उतरल्याची चर्चा आहे. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी