नवी दिल्ली : लडाखमधील ट्रान्झिट कॅम्प प्रतापपूरहून सब सेक्टर हनिफकडे जाणाऱ्या सैनिकांच्या तुकडीला घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या वाहनाला अपघात होऊन सात जवानांचा मृत्यू झाला. या सर्व सैनिकांना चीन सीमेला लागून असलेल्या फॉरवर्ड लोकेशनवर पाठवले जात होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लष्कराचे वाहन प्रतापपूरपासून 25 किमी पुढे आले असता, त्याचवेळी काही कारणास्तव वाहनाचा तोल बिघडल्याने ते सुमारे 60 फूट खाली दरीत पडले.
अधिक वाचा :
वाहनातील चालकासह 26 जण तेथेच श्योक नदीत पडले. मात्र लष्कराच्या आपत्कालीन कारवाईत सर्व लोकांना नदीतून बाहेर काढून तातडीने बेसकॅम्पवर नेण्यात आले. बेस कॅम्पमध्ये उपचारासाठी आणलेल्या जवानांपैकी 7 जवानांना मृत घोषित करण्यात आले. प्रतापपूरच्या ४०३ फिल्ड हॉस्पिटलमध्ये जवानांवर उपचार सुरू असून, ज्या जवानांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना अन्य ठिकाणी हलवण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेल्या आणखी काही सैनिकांना हवाई दलाच्या विशेष विमानाने उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात पाठवले जात आहे.
अधिक वाचा :
या अपघातात सर्व जवान गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जवानांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सैनिकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गंभीर जखमी जवानांना वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. या अपघातात शहीद झालेल्या जवानांबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. हे सैनिक देशाच्या कोणत्या भागातील होते याची माहिती लष्कराची सूत्रे लवकरच देणार आहेत. याशिवाय गंभीर जखमी झालेल्यांच्या ताज्या स्थितीबाबतही लष्कराच्या सूत्रांकडून माहिती घेतली जात आहे.