CDS General Rawat’s shocking demise throws up questions on succession नवी दिल्ली: पुण्यात जन्मलेले भारताच्या लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या सैन्यातल्या सर्वोच्च पदासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. यामुळे रिक्त झालेल्या सीडीएस पदावर जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा सीडीएस दिवंगत बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारानंतर होण्याची शक्यता आहे.
भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीडीएस हे महत्त्वाचे पद दीर्घकाळ रिक्त ठेवले जाणार नाही. यामुळेच रावत यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर सीडीएस पदाचा नवा उत्तराधिकारी जाहीर केला जाईल, असे समजते. या पदासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव आघाडीवर आहे.
याआधी लष्करप्रमुख पदावर असलेल्या रावत यांची भारताचे पहिले सीडीएस म्हणून नियुक्ती झाली तर लष्करप्रमुख या पदावर जनरल नरवणे यांची नियुक्ती झाली. यामुळे आता नरवणे यांचेच नाव सीडीएस पदासाठी आघाडीवर आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल या सैन्याच्या तीन मुख्य विभागांच्या प्रमुखांमध्ये जनरल नरवणे हे वरिष्ठ आहेत. ते नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांपेक्षा अनुभव आणि वयाच्या बाबतीत जवळपास दोन वर्षांनी वरिष्ठ आहेत. यामुळे सीडीएस पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे.
भारताचे सध्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे देशाचे २८वे लष्करप्रमुख आहेत. ते सातव्या शीख लाइट इन्फ्रंट्रीमध्ये १९८० मध्ये भरती झाले होते. कारगिल युद्धाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. लष्करप्रमुख होण्याआधी ते लष्कराचे उपप्रमुख होते. लष्कराच्या पूर्व विभागाचे (इस्टर्न कमांड) कमांडर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. तसेच त्यांनी लष्कराच्या प्रशिक्षण विभागाचे प्रमुखपद प्रभावीरित्या हाताळले आहे.
परम विशिष्ट सेवा मेडल (पीव्हीएसएम), अती विशिष्ट सेवा मेडल (एव्हीएसएम), सेना मेडल (एसएम), विशिष्ट सेवा मेडल (व्हीएसएम) विजेते जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचे नाव सीडीएस पदासाठी आघाडीवर आहे. जनरल नरवणे यांना ही नियुक्ती मिळाली तर ते देशाचे दुसरे सीडीएस आणि महाराष्ट्रात जन्मलेले पहिले सीडीएस ठरतील.
नव्या सीडीएसना रावत यांचे अपूर्ण राहिलेले थिएटर कमांडच्या निर्मितीचे काम पूर्ण करायचे आहे. भारतीय संरक्षण विभाग किमान तीन थिएटर कमांड विकसित करण्याचा विचार करत आहे. यापैकी एक भारत-पाकिस्तान सीमेवर तर दुसरी भारत-चीन सीमेवर सक्रीय असेल. तिसरी थिएटर कमांड ही भारताच्या निवडक बेटांवर तसेच भोवतालच्या समुद्रात सक्रीय असेल. थिएटर कमांड या प्रकारात सैन्याच्या सर्व विभागांना परस्पर समन्वय राखून काम करावे लागेल. यात सैन्याच्या वेगवेगळ्या विभागांतील अधिकाऱ्यांना एकत्र येऊन समन्वयाने देशाच्या रक्षणासाठी मोठी जबाबदारी सांभाळावी लागेल. या प्रक्रियेसाठी रावत यांनी एक निश्चित नियोजन केले होते. त्यांच्या अपघाती निधानानंतर ही योजना अंमलात आणण्याची जबाबदारी नव्या सीडीएसची असेल.