Electric Scooter Fire : नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वेहिकलबद्दल मोठी चर्चा सुरू आहे. असे असताना अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या आगीच्या घटनांमुळे ग्राहक आणि इलेक्ट्रिक स्कूटर बनवणार्या कंपन्या चिंतेत आहेत. परंतु इलेक्ट्रिक स्कूटर्संना आग का लागत आहेत याचे कारण एका इलेक्ट्रिक स्कूटर बनवणार्या कंपनीने दिले आहे. (Ather Energy analysis of electric scooter fire in india and battery issue )
इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी एथर एनर्जीने या घटनांचे विश्लेषण केले आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याचे प्रमुख कारण त्यातील बॅटरी आहे असे या कंपनीने म्हटले आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ज्या बॅटरीज आहेत त्या थंड हवामान असलेल्या देशांसाठी बनवलेल्या आहेत. अनेक इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांनी त्यांच्या स्कूटरसाठी लागणार्या बॅटरीज या परदेशातून आयात केल्या आहेत. या बॅटरी भारतीय हवामानानुसार बनवल्या पाहिजेत असे मत कंपनीने व्यक्त केले आहे.
भारतीय हवामानाला अनुरुप अशा बॅटरीज बनवण्याचे एथर एनर्जी कंपनीने ठरवले आहे. तसेच कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्यापूर्वी त्याची सामान्य रस्त्यांवर चाचणी व्हावी असेही कंपनीने म्हटले आहे. फक्त भारतीय परिस्थिती समोर ठेवूनच नव्हे तर ग्रीड चार्जिंग आणि रस्त्यावरील वाईट परिस्थितींचा विचार करून आपले उत्पादन बनवले पाहिजे असेही कंपनीने म्हटले आहे. स्कूटरमध्ये चांगल्या बॅटरीसाठी चांगली बॅटरी मॅनेजमेंट असायला हवी. इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणण्यापूर्वी टेस्टिंग आणि मानकांच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नये त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो असेही कंपनीने म्हटले आहे.
ओला, ओकिनावा आणि प्योर ईव्ही या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. तेव्हा केंद्र सरकारने याची दखल घेतली असून डीआरडीओकडे चौकशीचे आदेश दिले आहेत. पुण्यात ओला स्कूटरला लागलेली आग आणि ओकोनावा स्कूटरला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी डीआरडीओ करणार आहे.