Australia recognises Covaxin भारताच्या लसीकरण मोहिमेला मोठे यश, कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियाची मंजुरी

Australia recognises Bharat Biotech's Covaxin भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले. भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसला ऑस्ट्रेलियाने मंजुरी दिली.

Australia recognises Bharat Biotech's Covaxin
भारताच्या लसीकरण मोहिमेला मोठे यश, कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियाची मंजुरी 
थोडं पण कामाचं
  • भारताच्या लसीकरण मोहिमेला मोठे यश, कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियाची मंजुरी
  • परदेशी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया हा पर्याय निवडणाऱ्या आशिया खंडातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे
  • ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, ओमान, फिलिपीन्स, नेपाळ, मेक्सिको, इराण, श्रीलंका, ग्रीस, इस्टोनिया, झिम्बाब्वे या देशांनी कोवॅक्सिनला मंजुरी दिली

Australia recognises Bharat Biotech's Covaxin । सिडनी: भारताच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले. भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसला ऑस्ट्रेलियाने मंजुरी दिली. या मंजुरीमुळे कोवॅक्सिन लसचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला ऑस्ट्रेलियात जाणे शक्य होणार आहे. अनेक देशांनी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेल्या कोविशिल्ड या लसला मंजुरी दिली आहे. यामुळे कोविशिल्डचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तीला संबंधित देशात जाणे शक्य आहे. आता कोवॅक्सिनला मंजुरी मिळू लागली आहे. यामुळे भारतीय कंपन्यांचे उत्पादन असलेल्या लसचे दोन डोस घेऊन परदेशी जाणे सोपे होण्याची प्रक्रिया आणखी वेग घेत आहे.

परदेशी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया हा पर्याय निवडणाऱ्या आशिया खंडातील विद्यार्थ्यांची संख्या मागील काही वर्षांत वाढली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाने दिलेली मंजुरी कोवॅक्सिनचे महत्त्व वाढवणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताच्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन तसेच चीनच्या कोरोनावॅक आणि बीबीआयबीपी-कोरवी या लसना मंजुरी दिली आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेने आतापर्यंत इंग्लंड-भारत-दक्षिण कोरियाच्या कोविशिल्ड, चीनच्या कोरोनावॅक आणि बीबीआयबीपी-कोरवी तसेच अमेरिकेतील फायझर आणि जॉन्सन या दोन्ही कंपन्यांच्या लसना मंजुरी दिली आहे. 

कोवॅक्सिन लसला जागतिक आरोग्य संघटनेची लवकरच मंजुरी मिळेल. ही मंजुरी मिळाल्यानंतर ज्या देशांना अद्याप लसचे डोस मिळालेले नाही अशा अनेक गरीब देशांना भारताकडून लसीकरण मोहिमेसाठी लसच्या स्वरुपात मदत मिळू शकेल. तसेच ज्या देशांना पैसे मोजणे शक्य आहे असे देश वाजवी दरात उपलब्ध असलेल्या भारताच्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसची खरेदी करू शकतील. जगात उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसच्या पर्यायांपैकी भारतीय पर्याय वाजवी दरात उपलब्ध आहेत. काही लसच्या साठवणुकीचा खर्च मोठा आहे. या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या लसची साठवणूक करणेही सोपे आणि कमी खर्चिक आहे. यामुळे जगातील अनेक देशांचा कल भारतीय लस उत्पादनांकडे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२१ मध्ये कोवॅक्सिन लसचे दोन डोस घेतले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, ओमान, फिलिपीन्स, नेपाळ, मेक्सिको, इराण, श्रीलंका, ग्रीस, इस्टोनिया, झिम्बाब्वे या देशांनी कोवॅक्सिनला मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर कोवॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची बैठक बुधवार ३ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. 

हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने कोवॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. या लसच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान झालेल्या चाचण्यांमध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर / Indian Council of Medical Research / ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही / National Institute of Virology / NIV) या संस्था सहभागी झाल्या होत्या. 

भारत बायोटेककडून शेवटची माहिती १८ ऑक्टोबर २०२१ रोजी मिळाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. कंपनीकडून आणखी माहिती मिळाल्यानंतर निर्णय घेणे सोपे होईल असे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने ३ नोव्हेंबर २०२१ रोजी कोवॅक्सिनला मंजुरी देण्याबाबत बैठक घेणार असल्याचे जाहीर केले. बैठकीची तारीख जाहीर करतानाच भारतीय औषध आणि लस निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांवर विश्वास असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी