आजपासून पुढचे 3 दिवस बँका राहणार बंद, सगळा भार डिजिटल पेमेंटवर

आजपासून तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेतील महत्त्वाची कामं आज राहिली असतील तर तुम्हाला आणखीन तीन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

Bank Strike
पुढचे 3 दिवस बँका राहणार बंद, सगळा भार डिजिटल पेमेंटवर  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आजपासून तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी असे दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे बँकेतील महत्त्वाची कामं आज राहिली असतील तर तुम्हाला आणखीन तीन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यानंतर रविवार आल्यानं सलग 3 दिवस बँका बंद असतील. वेतनवाढीच्या मागणीबाबत भारतीय बँक महासंघ अर्थात आयबीए या बँक व्यवस्थापनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळाशी वाटाघाटी असफल झाल्याने बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारला आहे. संपाच्या काळात ग्राहकांना केवळ ऑनलाईन बँकिंगची सुविधा उपलब्ध असेल. 

भारतीय स्टेट बँकेसह अन्य काही बँकांनी आपापल्या ग्राहकांना या संपाविषयी गुरुवारी माहिती दिली. सलग दोन दिवस चालणाऱ्या या संपामुळे कामकाजावर परिणाम होईल, असे या बँकांनी ग्राहकांना सांगितलं आहे.  बँकांच्या युनायटेड फोरमने वेतन सुधारणेची प्रमुख मागणी आयबीएकडे केली होती. नोव्हेंबर २०१७पासून ही मागणी प्रलंबित आहे. यासंदर्भात १३ जानेवारी रोजी मुंबईत फोरमची बैठक झाली होती. त्यामध्ये वेतन सुधारणेसंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचे ठरवण्यात आले होते. यापूर्वीची वेतन सुधारणा १ नोव्हेंबर २०१२ ते ३१ ऑक्टोबर २०१७ या कालावधीसाठी झाली होती. बँक संघटनांनी २० टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे.

जानेवारी महिन्यात बॅंक कर्मचारी संपावर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ८ जानेवारीला बॅंक कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांनी सहभाग घेतला होता. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असला तरी बॅंक कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत. 

इंडियन बॅंक असोसिएशनसोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. 9 संघटनांचा सहभाग असलेल्या युनायडेट फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटनांचा यामध्ये समावेश आहे.

सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्चमध्ये आणखी तीन दिवस संपाचा इशारा बॅंक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. फेब्रुवारीत तब्बल 11 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. पुढील महिन्यात 6 सार्वजनिक सुट्ट्या असून दुसरा आणि चौथा शनिवार रविवार आणि 1 फेब्रुवारीचा संपाचा दिवस असे 11 दिवस बॅंका बंद राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी