ऑनलाइन तिकीट बुक करणं पडलं महागात, ७ लाख रुपयांची फसवणूक

ऑनलाईन फ्लाइटचे तिकिट बुक करणं एका व्यक्तीला महागात पडलं आहे. कारण यामुळे त्याला चक्क आपले ७ लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Cyber_Crime
ऑनलाइन तिकीट बुक करणं पडलं महागात, ७ लाख रुपयांची फसवणूक   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊन दरम्यान सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ
  • बंगळुरूमधील एका व्यक्तीची तिकिट बुकिंगच्या नावाखाली फसवणूक, ७ लाखांचे नुकसान
  • पोलिसांनी एफआयआर नोंदवून केला तपास सुरू

बंगळुरू: ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे प्रकार सध्या समोर येत आहेत. यामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाउननंतर एकीकडे ऑनलाईन व्यवहाराचा ट्रेंड वाढला असतानाच सायबर क्राइमच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. ऑनलाईन तिकीट बुक करण्याच्या प्रकरणात एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तब्बल ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अशी झाली फसवणूक

३० डिसेंबरला सायबर क्राईममुळे बंगळुरू येथील राजेंद्र (नाव बदलले) यांचे सात लाख रुपये बुडाले. वास्तविक राजेंद्र तिरुअनंतपुरमसाठी विमानाचं तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करीत होता. राजेंद्र यांनी  एका अ‍ॅपद्वारे ७ जानेवारीसाठी विमानाचे तिकीट बुक केले. त्यानंतर एक मेसेज आला की अद्याप तिकीटाचे पैसे मिळालेले नाहीत. परंतु त्याचवेळी त्यांना बँकेचा मेसेज आला आला की, त्यांच्या बँक खात्यातून सात लाख रुपये काढण्यात आले आहेत.

एक ओटीपी आणि लाखो रुपये खात्यातून गायब

राजेंद्र म्हणाले, 'मी ३१ डिसेंबर रोजी तिकीट बुकिंग कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल केला. दीपक कुमार शर्मा या नावाच्या व्यक्तीने समोरुन आपली ओळख करून दिली आणि सांगितले की, तांत्रिक कारणांमुळे आम्ही तुमच्या तिकिटाचे पैसे घेऊ शकलेलो नाही. यावेळी त्याने मला दुसऱ्या बँक खात्याचा क्रमांक मागितला. मी त्याला खात्यातील शेवटचे चार अंक सांगितले. त्यानंतर मला बँकेच्या व्यवहारासाठी अनेक ओटीपी येत होते. त्यानंतर अचानक सात लाख रुपये माझ्या खात्यातून काढण्यात आल्याचा मेसेज आला.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या पोलिसांनी आयपीएसी आणि आयटी अधिनियमांनुसार विविध कलमांअंतर्गत सायबर क्राईम आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी तपास देखील सुरु केला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी