बंगळुरू: ओडिशातील एका बँक कर्मचाऱ्याची (Bank employee) बंगळुरूमध्ये (Bengaluru) दोन सुरक्षा रक्षकांनी हत्या (Murder) केल्याचं समोर आलं आहे. बंगळुरूच्या मराठाहल्ली भागात एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी चोर समजून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बंगळुरूमध्ये दोन सुरक्षा रक्षकांनी चोर समजून केली बँक कर्मचाऱ्याची हत्या
अभिनाश पाथी (वय २७ वर्ष) असे मृताचे नाव असून तो ओडिशाचा रहिवासी आहे. तो एका खासगी बँकेत नोकरीला होता आणि प्रशिक्षणासाठी बंगळुरूला आला होता. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, तो त्याच्या मोठ्या भावाच्या मित्रांच्या खोलीत राहत होता.
दरम्यान, अभिनाश पाथी याची हत्या करणाऱ्या दोन सुरक्षा रक्षकांची नावं श्यामनाथ रे आणि अजित मुरा अशी आहेत. दोघेही आनंद नगर, २४, एचएएल येथील रहिवासी आहेत. दोघांनाही बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनाश 3 जुलै रोजी उशिरा मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. पार्टीवरुन परतत असताना त्याचा मोबाइल बंद झाल्याने तो मराठाहल्ली येथील वंशी सिटाडेल अपार्टमेंट नेमकं कुठं आहे हेच विसरला. पण, 4 जुलै रोजी पहाटे 2 च्या सुमारास अभिनाश अपार्टमेंट (वंशी सिटाडेल) कुठे आहे हे शोधण्यात यशस्वी झाला. त्यावेळी सुरक्षा रक्षकांपासून वाचण्यासाठी त्याने गेटमधून उडी मारली.
पोलिसांनी दोन्ही सुरक्षा रक्षकांना केली अटक
दरम्यान, रात्री ड्युटीवर असलेल्या श्यामनाथ आणि अजित या दोन सुरक्षा रक्षकांनी त्याला अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडे तपशील विचारला. पण आपला मित्र या सोसायटीत राहतो हे अभिनाशला नीटपणे सांगता आले नाही किंवा सुरक्षा रक्षकांना ते पटवून देता आलं नाही. त्यानंतर झालेल्या झटापटीत श्यामनाथ आणि अजित या दोन्ही सुरक्षा रक्षकांनी अभिनाश याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
या हल्ल्यादरम्यान अभिनाश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला.
अधिक वाचा: सासरच्यांकडून जावयाची निर्घृण हत्या, कारण ऐकून झाले सर्वच हैराण
दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या एचएएल पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून दोनही सुरक्षा रक्षकांना तात्काळ अटक केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी सांगितले की, त्यांना अभिनाश चोर असावा असं वाटलं आणि त्याच चुकीच्या समजातून त्यांनी त्याला मारहाण केली..
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने पोलिसांना सांगितले की जेव्हा मृताने त्याला अपार्टमेंटमध्ये जाण्यापासून रोखले तेव्हा त्याने सुरक्षा रक्षकांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता. ज्यामुळे त्यांच्यात झटापट झाली आणि त्याच झटापटीत झालेल्या माराहाणीत अभिनाशला आपला जीव गमवावा लागला.