भारत बायोटेकची कोवॅक्सिन मार्चपासून बाजारात

भारत बायोटेक कंपनी कोरोनावर मात करण्यासाठी कोवॅक्सिन केंद्र सरकारला पुरवत आहे. कंपनी मार्चपासून लस भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे.

Bharat Biotech to launch Covaxin in March 2021
भारत बायोटेकची कोवॅक्सिन मार्चपासून बाजारात 

थोडं पण कामाचं

  • भारत बायोटेकची कोवॅक्सिन मार्चपासून बाजारात
  • ९०० ते एक हजार रुपयांत मिळेल लस
  • भारत बायोटेक कंपनी २४ अथवा २५ मार्च पासून कोवॅक्सिनची खुल्या बाजारातील विक्री सुरू करण्याच्या प्रयत्नात

हैदराबाद: भारत बायोटेक कंपनी कोरोनावर मात करण्यासाठी कोवॅक्सिन केंद्र सरकारला पुरवत आहे. कंपनी मार्चपासून लस भारतीय बाजारात खुल्या विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. (Bharat Biotech to launch Covaxin in March 2021)

भारतात उद्यापासून (शनिवार, १६ जानेवारी २०२१) कोरोना आजारावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. या मोहिमेसाठी केंद्र सरकारने १ कोटी १० लाख डोस पुण्याच्या सीरमकडून खरेदी केले आहेत. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कोविशिल्ड या लसची निर्मिती करत आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ही लस मोठ्या प्रमाणावर वापरली जाणार आहे. निवडक नागरिकांना कोवॅक्सिन दिली जाणार आहे. याच कारणामुळे ज्यांना पहिल्या टप्प्यात लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे, अशा १८ वर्षांवरील नागरिकांसाठी भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन भारतीय बाजारात विकणार आहे. खुली विक्री सुरू झाल्यावर ९०० ते एक हजार रुपयांत खरेदी करुन डॉक्टरांमार्फत लसीकरण करुन घेता येईल. 

कोरोना संकटाची जाणीव झाल्यावर भारतात आधी एक दिवसाचा जनता कर्फ्यू झाला. यानंतर सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. देशातले पहिले लॉकडाऊन २५ मार्च ते १४ एप्रिल असे २१ दिवस होते. याच कारणामुळे भारत बायोटेक कंपनी २४ अथवा २५ मार्च पासून कोवॅक्सिनची खुल्या बाजारातील विक्री सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. 

कोवॅक्सिन ही लस दोन ते आठ अंश से. तापमानात दीर्घकाळ सुरक्षित राहू शकते. ही बाब लक्षात घेऊन बाजारातील वितरणाच्यादृष्टीने तयारी सुरू आहे. भारत सरकारने पहिल्या टप्प्यासाठी कोविशिल्डची मोठी मागणी नोंदवली आहे. तसेच भारतातून कोविशिल्ड अनेक देशांना निर्यात होणार आहे. प्रामुख्याने वेगवेगळ्या देशांच्या सरकारकडून कोविशिल्ड लसला मागणी आहे. पण जगभर डॉक्टर, मेडिकल स्टाफ, फ्रंटलाइन वर्कर आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्राधान्याने कोविशिल्ड दिली जाणार आहे. मात्र अठरा वर्षे झालेले त पन्नाशीच्या आतले अशा मोठ्या समुदायाची मागणी सरकारी लसीकरणातून लवकर पूर्ण होणे कठीण आहे. याच कारणामुळे भारत बायोटेक कंपनीच्या कोवॅक्सिन या लसची खुल्या बाजारात विक्री केली जाणार आहे. या विक्रीतून ज्यांना लवकर लस मिळणार नाही पण लसीकरण करुन घेण्याची इच्छा आहे त्यांची सोय होणार आहे. 

भारत सरकारने सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांशी चर्चा केली. यानंतर एका कंपनीने सरकारी मागणीला तर दुसऱ्या कंपनीने खासगी मागणीला प्राधान्य द्यायचे अशा स्वरुपाचे नियोजन झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारताची लोकसंख्या १३८ कोटींपेक्षा जास्त आहे. यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांची संख्या ९० कोटींपेक्षा जास्त आहे. याच कारणामुळे नियोजन करुन लसीकरण सुरू आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे.

भारत बायोटेक कंपनी अठरा वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांसाठी एक लस विकसित करत आहे. या लसच्या पहिल्या टप्प्यातील प्रयोगाला परवानगी मिळाली आहे. तसेच नाकातून थेंब टाकून लस देण्यासाठीही भारत बायोटेक कंपनी प्रयोग करत आहे. हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले तर कोरोना संकटावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी