Kupwara Encounter : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुपवाडामध्ये सुरक्षा दलांना (Security forces) मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कर-ए-तैयबा (LTE) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी (terrorist )ठार झाले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचा समावेश आहे.
काश्मीर झोनचे IG विजय कुमार यांनी सांगितले की, चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, त्यापैकी एक पाकिस्तानी दहशतवादी तुफैलही आहे. कुपवाडा येथील चक्रकंडी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने नाकाबंदी सुरू केली. घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले आणि 2 दहशतवाद्यांना ठार केले. या भागात अजूनही दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत, गेल्या 5 वर्षांत 900 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, 2018 मध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत 257 दहशतवादी मारले गेले. 2019 मध्ये 157 दहशतवाद्यांना जवानांनी ठार केले. 2020 मध्ये 221 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. याच वर्षी 2021 मध्ये 193 दहशतवादी मारले गेले होते तर यावर्षी 6 जूनपर्यंत 96 दहशतवादी मारले गेले आहेत.
काश्मीर झोनचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, एलईटीचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यात पाकिस्तानी दहशतवादी तुफैलचाही हात असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरात लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे. याआधी सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक पाकिस्तानी दहशतवादी ठार झाला, तर 3 दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल, 5 मॅगझिन आणि अनेक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.