Sonali Phogat Death News: पणजी (गोवा): हरियाणा भाजपच्या नेत्या आणि टिक-टॉक स्टार सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणात एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोनालीचा भाऊ आणि तिचं संपूर्ण कुटुंब हे सुरुवातीपासूनच तिच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त करत होते. याचवेळी सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने भाजप नेते सहकार्य करत नसल्याचा देखील आरोप केला आहे.
मूळची हरियाणाची असलेली सोनाली फोगाट हिचा मृत्यू झाल्याचं वृत्त जेव्हा समोर आलं होतं तेव्हा तिचा मृत्यू हृदयविकाराचा झटक्याने झाल्याचं सांगण्यात आलं होतं. तिला तात्काळ गोव्यातील अंजुना सेंट अँथनी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिला तिथे मृत घोषित करण्यात आलं.
आता या सगळ्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकताच सोनालीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये सोनालीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या आहे. ज्यानंतर याप्रकरणी गोवा पोलिसांनी 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला.
अधिक वाचा: 'Sonali Phogat च्या जेवणात होते विष', सोनालीच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
याबाबत सुरुवातीला सोनालीच्या कुटुंबीयांनी आरोप केला होता की, हा नैसर्गिक मृत्यू नसून ही हत्याच आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतर सोनालीच्या मृत्यूबाबत गूढ खूपच वाढलं आहे.
बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि हत्या?
सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने गोव्यातील अंजुना पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत फोगाटच्या दोन साथीदारांनी गोव्यात तिची हत्या केल्याचा दावा केला आहे. रिंकू ढाकाने तिच्या बहिणीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांच्यावर सोनालीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आणि व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. रिंकू म्हणाला की, कुटुंबीयांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) किंवा जयपूरमधील एम्समध्ये सोनालीचे पोस्टमॉर्टम करायचे आहे.
अधिक वाचा: Sonali phogat : टिकटॉक स्टार असलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाटचे खास किस्से, कोण होत्या फोगाट
कालपर्यंत सोनालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटका झाला किंवा तिने आत्महत्या केली असावी अशी एक थेअरी मांडली जात होती. मात्र आता हे प्रकरण बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि हत्या या भयंकर वळणावर येऊन पोहचलं आहे. सोनालीचा भाऊ, तिची बहीण, तिचे कुटुंबीय सोनालीचा मृत्यू नाही तर हत्या झालं असल्याचं वारंवार म्हणत आहेत. यामुळेच या घटनेमागचं नेमकं सत्य जाणून घेण्यासाठी ते सीबीआय चौकशीची मागणी करत आहे. आता प्रश्न असा आहे की, सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करेल का आणि सोनालीच्या मृत्यूचे सत्य बाहेर येईल का?