बिहार सरकारच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या...

लोकल ते ग्लोबल
Updated Jun 03, 2020 | 01:00 IST | टाइम्स नाऊ मराठी

बिहार सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

bihar
बिहार 

थोडं पण कामाचं

  • बिहार सरकारच्या एका निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या...
  • क्वारंटाईन कक्षातून बाहेर पडत असलेल्या प्रत्येकाला सरकारकडून अनोखी भेट
  • सरकारकडून नागरिकांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांची भेट

पाटणाः बिहार मागील काही आठवड्यांपासून क्वारंटाईन कक्षांमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांमुळे चर्चेत होते. पण आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा सुरू आहे. बिहार सरकारने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बिहारच्या नितीश कुमार सरकारने राज्यातील सर्व क्वारंटाईन कक्षांमधून बाहेर पडत असलेल्या कष्टकरी नागरिकांना विनामूल्य एक भेट द्यायला सुरुवात केली आहे. सरकारकडून कष्टकरी नागरिकांना कंडोमची पाकिटे आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा साठा दिला जात आहे. या भेटीचा कष्टकरी वर्गाला जास्त फायदा होईल, असा विश्वास बिहार सरकारला वाटत आहे.

रेल्वेच्या विशेष गाड्यांमधून देशातील वेगेवेगळ्या राज्यांमध्ये काम करत असलेले बिहारचे कष्टकरी नागरिक राज्यात परतत आहे. परतलेल्या प्रत्येकाला ठराविक दिवस सरकारी क्वारंटाईनमध्ये मुक्काम केल्यानंतर वैद्यकीय तपासणी करुन घरी जाण्यास परवानगी दिली जात आहे. टप्प्याटप्प्याने क्वारंटाईनमधून बाहेर येत असलेल्या बिहारच्या नागरिकांना नितीश कुमार सरकार कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या भेट देत आहे.

बिहारचे कष्टकरी नागरिक प्रमुख्याने होळी, दिवाळी, छठ अशा सणासुदीसाठी राज्यात येतात. एरवी ही मंडळी कामासाठी परराज्यात असतात. बिहारचा माणूस घरी परतला की ९ महिन्यांनंतर त्याचे परिणाम दिसतात. यामुळे प्रत्येक सणानंतर साधारण ९ महिन्यांनी राज्यातला बाळंतपणाचा दर वाढतो. बिहारमध्ये लोकसंख्या वेगाने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी राज्यात पुरेसे रोजगार आणि इतर सोयीसुविधाच उपलब्ध नाही. त्यामुळे बिहारमधील बुद्धिमान तरुणाई स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी सेवेत नोकरी मिळवणे पसंत करते तर बाकीचे नागरिक मिळेल ते कष्टाचे काम करण्याच्या उद्देशाने परराज्यात जातात. आधीच शिक्षणाचे प्रमाण कमी त्यात राज्यातील कष्टकरी वर्ग प्रदीर्घ काळ कुटुंबापासून लांब असतो. यामुळे सणाच्या निमित्ताने कष्टकरी घरी परतले तर त्याचा परिणाम त्यांच्या घरात बाळंतपणाने साजरा होतो. हे प्रकार वारंवार घडत असल्यामुळे बिहारमध्ये कुटुंब नियोजन योजनेचा बोजवारा उडाला आहे.

बिहारमधल्या अनेक गंभीर समस्यांमागे वेगाने वाढणारी लोकसंख्या हे एक मोठे कारण आहे. इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्या बिहारचा वर्तमान कुटुंब नियोजनाअभावी अडचणीत सापडला आहे. यावर उपाय म्हणून बिहार सरकारने कष्टकरी नागरिकांना क्वारंटाईनमधून बाहेर पडताना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या भेट देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या अभिनव प्रयोगाला यश मिळाल्यास बिहारमध्ये कुटुंब नियोजन यशस्वी होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. 

बिहारमधील क्वारंटाईनची गंभीर समस्या

बिहारमध्ये क्वारंटाईन कक्षात अन्न, पाणी, औषधे, स्वच्छतागृह (टॉयलेट) या किमान आवश्यक सुविधा व्यवस्थित मिळत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली. याच मुद्यावरुन बिहारच्या काही क्वारंटाईन कक्षांमध्ये नागरिकांनी आंदोलन केले. या आंदोलनांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. क्वारंटाईनचा हा गंभीर झालेला प्रश्न सोडवण्यासाठी या प्रकरणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लक्ष घातले  आहे. एकीकडे क्वारंटाईनचा प्रश्न सोडवत असतानाच मुख्यमंत्र्यांनी बिहारच्या क्वारंटाईनमधून बाहेर पडणाऱ्या कष्टकऱ्यांना अनोखी भेट द्यायला सुरुवात केली आहे. या भेटीविषयी नागरिकांच्या संमिश्र भावना आहेत. काहींनी सरकारच्या उपक्रमाचे स्वागत केले तर काही जणांनी आमच्यासाठी अन्न-पाणी आणि राहण्यासाठी निवारा एवढेच महत्त्वाचे मुद्दे असल्याचे सांगितले. मात्र केंद्र सरकारने बिहार सरकारच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी