'ताजमहाल'च्या बंदीस्त खोल्या उघडा, आतमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत की नाही ते तपासा; कोर्टात याचिका

BJP leader filed petition sought directives to ASI to open 20 rooms inside Taj Mahal ascertain whether Hindu idols : 'ताजमहाल'च्या बंदीस्त खोल्या उघडा, खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत की नाही ते तपासा; अशी मागणी करणारी याचिका कोर्टात करण्यात आली आहे.

BJP leader filed petition sought directives to ASI to open 20 rooms inside Taj Mahal ascertain whether Hindu idols
'ताजमहाल'च्या बंदीस्त खोल्या उघडा, कोर्टात याचिका  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'ताजमहाल'च्या बंदीस्त खोल्या उघडा, कोर्टात याचिका
  • बंद खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत की नाही ते तपासा, याचिका करणाऱ्याची मागणी
  • भारतीय पुरातत्व विभागाद्वारे तपासणी व्हावी अशी मागणी

BJP leader filed petition sought directives to ASI to open 20 rooms inside Taj Mahal ascertain whether Hindu idols : अयोध्या : 'ताजमहाल'च्या बंदीस्त खोल्या उघडा, खोल्यांमध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत की नाही ते तपासा; अशी मागणी करणारी याचिका कोर्टात करण्यात आली आहे. भाजपचे अयोध्या जिल्हा मीडिया प्रभारी डॉ. रजनीश यांनी ही याचिका केली आहे. डॉ. रजनीश यांची बाजू कोर्टात वकील रुद्र विक्रम सिंह हे मांडणार आहेत. 

आग्रा येथील ताजमहाल या वास्तूत २० खोल्या अनेक वर्षांपासून बंद आहेत. या बंद खोल्यांमध्ये काय आहे याची तपासणी भारतीय पुरातत्व विभागाला करू द्यावी, अशी मागणी डॉ. रजनीश यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. भारतीय पुरातत्व विभाग शास्त्रोक्त पद्धतीने पाहणी करण्यासाठी सक्षम आहे. खोल्यांमध्ये जर काही प्राचीन मूर्ती आढळल्या अथवा इतर कोणतेही प्राचीन संस्कृतीचे पुरावे आढळले तर त्याची तपासणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग हीच देशातील सर्वोत्तम संस्था आहे. यामुळे भारतीय पुरातत्व विभागाद्वारे तपासणी व्हावी अशी मागणी डॉ. रजनीश यांनी केली आहे. 

ताजमहाल या वास्तूवरून एक वाद आजही सुरू आहे. हा वाद संपुष्टात आणण्यासाठी ताजमहाल या वास्तूमधील बंद असलेल्या खोल्यांची तपासणी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे करणे हाच उत्तम पर्याय असल्याचे डॉ. रजनीश यांचे म्हणणे आहे. 

याआधी २०१५ मध्ये सहा वकिलांनी ताजमहालचे बांधकाम हे शिवमंदिराची मोडतोड करून झाले असल्याचा आरोप केला होता. भाजप नेते विनय कटियार यांनी २०१७ मध्ये अशाच स्वरुपाचा आरोप केला होता. जानेवारी २०१९ मध्ये भाजपच्या अनंत कुमार हेगडे यांनी ताजमहाल ही वास्तू शाहजहां याने बनविलेली नाही तर राजा जयसिम्हा यांच्याकडून विकत घेतली आणि त्यात बदल केले. ताजमहाल ही मूळ वास्तू नाही तर शिव मंदिराच्या रचनेत बदल करून आणि मोडतोड करून तयार केलेली वास्तू आहे असे मत भारतातील काही इतिहासकार आणि पुरातत्ववेत्ते यांचेही आहे.

ताजमहालवरून सुरू असलेल्या वादाला अनेक वर्षांचा इतिहास आहे. पण २०१८ मध्ये ताजमहालवरून आग्रा येथील एका कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी सुरू असताना भारतीय पुरातत्व विभागाने एक प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात सध्या अस्तित्वात असलेल्या वास्तूचे नाव ताजमहाल आहे आणि ही वास्तू शाहजहांने बांधल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ताजमहाल चर्चेत आहे आणि यावेळी बंद असलेल्या खोल्या उघडून त्यांची तपासणी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कोर्ट या मागणीवर काय निर्णय देते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी