दुदैवी योगायोग; भाजपच्या बड्या नेत्यांचा ऑगस्टमध्येच मृत्यू

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 25, 2019 | 13:52 IST | टाइम्स नाऊ हिंदी

योगायोगाने ऑगस्ट महिन्यातच भाजपला आपल्या चार दिग्गज नेत्यांना गमवावे लागले आहे. यात ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि बलरामजी दास टंडन या बड्या नेत्यांचा समावेश आहे.

bjp senior leaders
ऑगस्टमध्येच भाजपने गमावले चार बडे नेते   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जेटलींच्या मृत्युनंतर भाजपला मोठा राजकीय धक्का
  • चार दिग्गज नेत्यांचे ऑगस्टमध्ये झाले निधन
  • सुषमा स्वराज यांच्यानंतर अरुण जेटलींनीही सोडले जग

नवी दिल्ली: देशात गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएची सत्ता आहे. देशात काँग्रेसनंतर एक हाती सत्ता मिळवलेला भाजप हा एकमेव पक्ष आहे. दोन खासदारांपासून सुरू झालेला भाजपचा प्रवास आज, स्पष्ट बहुमतापर्यंत झाला आहे. इथवर पोहोचण्यासाठी भाजपला प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. या संघर्षात अनेक नेत्यांना पक्षाला आपलं संपूर्ण आयुष्य वाहून टाकलंय. सत्तेवर असण्याचा गोडवा अनुभवण्याचे दिवस असताना अनेक दिग्गज नेत्यांनी या जगातून एक्झिट घेतली आहे. त्याचा भाजपला राजकीय फटका बसला आहे. या सगळ्या नेत्यांनीच भाजपच्या सत्तेची पायाभरणी केली होती. त्यामुळे आता भाजपचे राजकीय नुकसान होत आहे. योगायोगाने ऑगस्ट महिन्यातच भाजपला आपल्या चार दिग्गज नेत्यांना गमवावे लागले आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि बलरामजी दास टंडन या बड्या नेत्यांचा समावेश आहे. भाजपसाठी हे चारही नेते महत्त्वाचे होते.

बलरामजी दास टंडन

गेल्या वर्षी १४ ऑगस्ट रोजी बलरामजी दास टंडन यांचे निधन झाले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या फळीत टंडन यांचा समावेश होता. त्यांनी पंजाबचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेच पंजाबच्या मंत्रिमंडळातही त्यांनी काम केले होते. पंजाब विधानसभेचे ते सहा वेळा सदस्य होते. टंडन हे जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. आणीबाणीच्या काळात ते १९ महिने कारागृहात होते. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांना छत्तीसगडचे राज्यपाल करण्यात आले होते.

अटल बिहारी वाजपेयी

भारताच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभळणारे अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन १६ ऑगस्ट २०१८ रोजी झाले. ते तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. वाजपेयी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या साथीने ६ एप्रिल १९८० रोजी भाजपची स्थापना केली होती. वाजपेयी यांच्या नेतृत्वाचा देशात वेगळाच करिष्मा होता. ते प्रखर नेते होते आणि तेवढचे संवेदनशील कवीदेखील होते. त्यांची अनेक भाषणे गाजली. पाच वर्षे कोणत्याही अडथळ्याशिवाय बिगर काँग्रेसी सरकार चालवण्याचे काम मोदी यांच्या आधी वाजपेयी यांनी केले होते. २०१५मध्ये वाजपेयी यांना भारतरत्न सन्मान देण्यात आला होता.

सुषमा स्वराज

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे ६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यादिवशी संध्याकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री म्हणून सुषमा स्वराज यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कामाचे देशातच नव्हे तर विदेशातही कौतुक झाले होते. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी यंदाची लोकसभा लढवण्यास नकार दिला होता. याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिले होते. मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्या कॅबिनेटमध्ये असतील, अशी अपेक्षा होती. पण, निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर त्या ठाम होत्या. लोकसभेत विरोधीपक्ष नेत्या म्हणूनही त्यांनी काम केले होते. विरोधी पक्षातही चांगले संबंध असणाऱ्या नेत्यांमध्ये स्वराज यांचा समावेश होता.

अरुण जेटली

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे काल (२४ ऑगस्ट) निधन झाले. त्यांना ९ ऑगस्ट रोजी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. देशातील नामवंत वकिलांमध्ये जेटली यांचा समावेश होता. ते सुप्रीम कोर्टात वकीली करत होते. २००९ ते २०१४ याकाळात त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यभार स्वीकारला होता. २०१४मध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी आली. मधल्या काळात त्यांना संरक्षण मंत्रालयाची धुराही सांभाळावी लागली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. पण, मोदींनी त्यांना राज्यसभेतून मंत्रिमंडळात स्थान दिले होते. या चारही नेत्यांसोबत भाजपने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदन लाल खुराना, माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनाही गमावले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...