Presidential Elections 2022 : देशाला आणखी एक मुस्लीम राष्ट्रपती मिळण्याची शक्यता, भाजपकडून या दोन नेत्यांची नावं चर्चेत

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार कोण असणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये दोन नावं सध्या पुढं आहेत.

Presidential Elections 2022
देशाला आणखी एक मुस्लीम राष्ट्रपती मिळण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांबाबत चर्चा सुरू
  • केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या नावाची चर्चा
  • मुख्तार अब्बास नक्वींचंही नाव चर्चेत

Presidential Elections 2022 | भारताचे नवे राष्ट्रपती (New President) कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचायला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (Elections) होणार असून त्यात दोन्ही पक्षांकडून नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी कुठलीही शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. 

धक्कातंत्राचा वापर

भाजपने यापूर्वी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर करताना धक्कातंत्राचा वापर केला आहे. प्रत्यक्षात राजकीय वर्तुळात वेगळ्याच नावांची चर्चा सुरू असते, मात्र ऐनवेळी सर्वांना अनपेक्षित उमेदवाराचं नाव भाजपकडून घोषित केलं जातं. निवडणुकीपूर्वी काही दिवस राजकीय वर्तुळात अनेक नावं चर्चिली जातात. भाजपच्या काही नेत्यांकडूनही तशी विधानं केली जातात. त्यामुळे राजकीय हवा गरम होते आणि उमेदवारांच्या नावांची चर्चा खात्रीशीरपणे रंगू लागते. गेल्या राष्ट्रपती निवडणुकीवेळी म्हणजेच 2017 साली रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर करून भाजपने सर्वांनाच धक्का दिला होता. त्यापूर्वी कुठेही कोविंद यांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत नव्हतं. त्याचप्रमाणे व्यंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन भाजपने असाच धक्का दिला होता. 

जातीय समीकरण

भाजपनं नेहमीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणं साधण्याचा प्रयत्न केल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. आपला हिंदुत्वाचा अजेंडा बाजूला ठेऊन जातीय आणि धार्मिक समीकरणं जुळवण्यासाठी आपल्या निर्णयाचा काय उपयोग होऊ शकतो, याचा विचार करून भाजपकडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर केला जात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे यंदादेखील भाजप असाच कुणी हटके उमेदवार जाहीर करेल आणि सर्वांनाच धक्का देईल, असं मानलं जात आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून सध्या दोन नावांची चर्चा आहे. 

आरिफ मोहम्मद खान

मुस्लीम उमेदवारांपैकी राष्ट्रपतीपदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव आहे आरिफ मोहम्मद खान यांचं. मुख्य माध्यमांत आणि सोशल मीडियातही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. आरिफ मोहम्मद हे सध्या केरळचे राज्यपाल आहेत आणि पुरोगामी मुस्लीम नेते अशी त्यांची ओळख आहे. देशात आणि जगभरात पुरोगामित्वाचा संदेश देण्यासाठी भाजप आरिफ मोहम्मद खान यांची निवड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अधिक वाचा - सिद्धू मूसेवालाची हत्या होणार हे एका आठवड्यापूर्वीच माहिती होती या व्यक्तीला, जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती

मुख्तार अब्बास नक्वी

आरिफ मोहम्मद खान यांच्यापाठोपाठ मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. जुलै महिन्यात नक्वी यांचा राज्यसभेचा कार्यकाल संपत आहे. त्यानंतर त्यांच्याकडील मंत्रीपदाचाही त्यांना त्याग करावा लागू शकतो. रामपूर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत नक्वी यांना उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र तसं झालेलं नाही. त्यामुळे नक्वी यांना कदाचित राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करण्यासाठीच रिकामं ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी