Game and tobacco in assembly : विधानसभेत आमदारांनी मळली तंबाखू, खेळत बसले मोबाईल गेम! Video झाला Viral

सभागृहाचं कामकाज सुरू असताना भाजपचे एक आमदार मोबाईल गेम खेळण्यात मश्गूल होते, तर दुसरे आमदार चक्क तंबाखू आणि मसाला एकत्र करून तोबरा भरताना दिसले.

Game and tobacco in assembly
विधानसभेत मळली तंबाखू, खेळले मोबाईल गेम  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भाजपच्या आमदार महोदयांनी विधानसभेत खाल्ली तंबाखू
  • दुसरे आमदार महोदय रमले मोबाईल गेममध्ये
  • व्हिडिओ समोर आल्यावर समाजवादी पक्षाकडून जोरदार टीका

Game and tobacco in assembly: विधानसभेचं (Assembly) कामकाज सुरू असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी जर जनतेने निवडून दिलेली लोकप्रतिनिधी (MLA) भर सभागृहात तंबाखू (Tobacco) मळू लागले आणि कानाला हेडफोन (Headphone) लावून मोबाईल गेम (Mobile Game) खेळण्यात रमू लागले, तर तुम्ही काय म्हणाल? हा सवाल केला आहे समाजवादी पक्षानं. याचं निमित्त ठरलाय नुकताच समोर आलेला उत्तर प्रदेशच्या विधानसभेतला (Uttar Pradesh Assembly) एक व्हिडिओ. या व्हिडिओत उत्तर प्रदेशचे एक आमदार महोदय दोन पुड्यांमधील ऐवज एकत्र करून बार भरताना दिसतात, तर दुसरे आमदार महोदय चक्क कानाला हेडफोन लावून विधानसभेच्या कामकाजापासून स्वतःला दूर दूर मोबाईल गेमच्या जगात घेऊन जाताना दिसतात. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून भाजपने या प्रकाराबाबत अजूनही मौन बाळगलं आहे. 

तंबाखू आणि गेम

विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत असते आणि नवे कायदे केले जातात. या प्रक्रियेत आमदारांनी सहभागी होणं आणि जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित असतं. मात्र उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार तंबाखू मळताना आणि मोबाईल गेम खेळताना दिसले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाने त्यावर जोरदार टीका केली असून राज्याच्या विधानसभेची गरिमा खालावण्याचा आणि प्रतिष्ठा कमी करण्याचा हा प्रकार निंदनीय असल्याची टीका केली आहे.

सपाने ट्विटरवरून या प्रकारावर हल्लाबोल करताना म्हटलंय, “भाजप आमदारांनी विधानसभेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. महोबाचे भाजप आमदार विधानसभेत मोबाईल गेम खेळत आहेत, तर झाशीचे भाजप आमदार तंबाखू खात आहेत. यांच्याकडे जनतेच्या प्रश्नाची उत्तरं नाहीएत. त्यामुळे विधानसभेला ते मनोरंजनाचा अड्डा बनवत आहेत. हे लाजीरवाणं आहे.”

व्हिडिओवरून खळबळ

या व्हिडिओवरून उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असली तरी हा व्हिडिओ नेमका कुणी रेकॉर्ड केला, याबाबत कुठलीही निश्चित माहिती समोर आलेली नाही. पाठिमागच्या बाजूने हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले असल्यामुळे आमदारांचे चेहरे त्यात पूर्णपणे दिसत नाहीत. त्यामुळे या व्हिडिओच्या सत्यतेची पुष्टी करता येत नसल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्या व्हिडिओत भाजप आमदार कानाला हेडफोन लावून मोबाईलवर गेम खेळताना दिसत आहेत. गेम खेळण्यात ते इतके गुंगले आहेत की आपल्या मागून कुणीतरी याचं रेकॉर्डिंग करत आहे, याची त्यांना जाणीवदेखील होत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्या व्हिडिओत भगवा कुर्ता घातलेले आमदार तंबाखू आणि मसाला हातात घेऊन ते एकत्र करत आहेत आणि तो ऐवज तोंडात टाकत असल्याचं दिसतं. यावरून समाजवादी पक्षानं भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडून मात्र अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी