Raj Thackeray Ayodhya Visit : लखनौ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्य दौर्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी उत्तर प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप खासदार बृज भूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही अशी धमकी दिली आहे. तसेच राज ठाकरे यांनी माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशात त्यांनाच काय त्यांच्या बापालाही घुसू देणार नाही असे वादग्रस्त विधानही केले आहे. राज ठाकरेंना रोखण्यासाठी ५० हजार लोक तैनात असतील असेही खासदार सिंह म्हणाले आहेत.
खासदार बृज भूषण सिंह म्हणाले की, उत्तर भारतींयाविरोधात केलेल्या वक्तव्यांबद्दल आधी राज ठाकरे यांनी माफी मागावी. राज ठाकरे यांनी माफी मागितल्या शिवाय त्यांनाच काय त्यांच्या बापालाही उत्तर प्रदेश आणि अयोध्येत प्रवेश करू देणार नाही अशी दर्पोक्तीही भाजप खासदार सिंह यांनी केली आहे. राज ठाकरे यांना रोखण्यासाठी रणनिती आखण्यात येणार आहे, तसेच यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची बैठक बोलावण्यात आल्याचे सिंह यांनी सांगितले.
शिवसेना नेते आदित्य ठाकरेही अयोध्या दौरा करणार आहेत, याचे भाजप खासदार सिंह यांनी स्वागत केले आहे. परंतु राज ठाकरे यांनी आधी माफी मागावी, राज ठाकरे हे राक्षस आहेत. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका स्विकारली असेल तर त्यांनी भगवान रामाच्या वंशजाची माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत येणार नाही. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय विद्यार्थी, मजूरांना मारहाण केली आहे म्हणून आपला राज ठाकरेंना विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती असे खासदार सिंह म्हणाले. जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देशाचे वाटोळे होईल अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतीयांविरोधात वक्तव्य केली होती. आता त्यांनी भूमिका बदलली असून ते अयोध्या दर्शनाला येणार आहेत. राज ठाकरे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात पोस्टर लागले असून काही झाले तरी राज ठाकरे यांना लखनौ विमानतळाबाहेर पडू देणार नाही अशी उघड धमकी सिंह यांनी दिली आहे.