Unemployment in India : असदुद्दीन ओवेैसी आणि वरुण गांधी आले एकत्र, बेरोजगारीच्या प्रश्नावरून मोदी सरकारवर ताशेरे

देशात बेरोजगारीच्या प्रश्नावरून आवाज उठवणारे भाजप खासदार वरुण गांधी यांनी AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसींचे आभार मानले आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नावर आवाज उठवल्याबद्दल त्यांनी ओवैसींनी धन्यवाद दिले आहेत.

Unemployment in India
‘या’ प्रश्नासाठी ओवैसी आणि वरुण गांधी एकत्र  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • वरुण गांधींनी मानले ओवैसींचे आभार
  • देशात बेरोजगारीचा मुद्दा सर्वात मोठा
  • वरुण गांधींनी उपलब्ध करून दिली बेरोजगारीची आकडेवारी

Unemployment in India | बेरोजगारी हा देशातील सध्याचा सर्वात मोठा प्रश्न (Biggest Issue) आहे. या प्रश्नासाठी आता सत्ताधारी भाजपतील नेतेही आवाज उठवत असल्याचं दिसत आहे. भाजप खासदार वरूण गांधी हे बेरोजगारीच्या प्रश्नावर गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आवाज उठवत आहेत. आपल्याच पक्षाचं सरकार असलं तरी त्याची फिकीर न करता ते तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न तावातावानं मांडताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि देशातील बेरोजगारी या प्रश्नांवर ते सातत्यानं आवाज उठवत आहेत. नुकताच वरुण गांधींनी AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांना धन्यवाद दिले आहेत. 

उंचावल्या सर्वांच्याच भुवया

भाजपचे खासदार AIMIM च्या खासदारांचं जाहीरपणे कौतुक करून त्यांचे आभार मानत असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण इथं प्रश्न पक्षाचा नसून प्रश्नाचा आहे. एकीकडे देशात बेरोजगारीनं कळस गाठला आहे आणि दुसरीकडे केंद्र सरकार रिकाम्या जागांवर भरती करत नाही, असा मुद्दा ओवैसींनी आपल्या भाषणात मांडला होता. त्याचं वरुण गांधींनी कौतुक केलं आहे. आपल्या भाषणात आपण सादर केलेले आकडे हे वरुण गांधींनीच उपलब्ध करून दिल्याचं ओवेैसींनी म्हटलं आहे. 

अधिक वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

काय म्हणाले वरूण गांधी?

वरुण गांधींनी आपल्या ट्विटमध्ये देशातील बेरोजगारीचे आकडे सादर केले होते. बेरोजगारी हा देशाचा सर्वात मोठा प्रश्न असून देशातील महत्त्वाच्या नेत्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं वरुण गांधींनी म्हटलं आहे. बेरोजगार तरुणांना न्याय मिळायला हवा, तरच देश शक्तीशाली होईल. रोजगाराबाबत मी उचलेल्या प्रश्नावर ओवैसींनी भाष्य केलं, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं वरुण गांधींनी म्हटलं आहे. 

काही दिवसांपूर्वी वरुण गांधी यांनी बेरोजगारीबाबत केंद्र सरकारचे आकडे जाहीर करत कुठल्या विभागात किती जागा रिक्त आहेत, याचे तपशील सादर केले होते. गेल्या तीन दशकांतील सर्वाधिक बेरोजगारी सध्या आहे. भरती होत नसल्यामुळे कोट्यवधी तरुण निराश आणि हताश आहेत. सरकारी आकडेवारीनुसार देशभरात 60 लाख सरकारी पदं रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यात येईल, असं आश्वासन देणाऱ्या बजेटमधील घोषणेचं काय झालं, असा सवाल वरुण गांधींनी केला आहे. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक तरुणाला मिळायला हवं, तो त्यांचा हक्कच आहे, असं वरुण गांधींनी म्हटलं होतं. 

सरकारलाच आव्हान

अनेकदा वरुण गांधी हे पक्षाची लाईन ओलांडून भाष्य करताना दिसतात. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या काळात वरूण गांधी यांनी आंदोलनाचं उघडपणे समर्थन केलं होतं. अनेकदा त्यांची भूमिका ही पक्षाच्या अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी असते. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत वरुण गांधी पक्षाच्या प्रचारापासून चार हात लांबच राहिले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी