कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal)मधील भाजप युवा मोर्चा (Bhartiya Janata Party Yuva Morcha)च्या नेत्या पामेला गोस्वामी (Pamela Goswami) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या बॅग आणि गाडीतून पोलिसांनी कोकेन जप्त (cocaine seized) केले आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पश्चिम बंगाल राज्य सचिव गोस्वामी यांना त्यांच्या एका मित्रासह अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव प्रबीर कुमार डे (Prabir De) असल्याची माहिती समोर आली आहे. पामेला आणि प्रबीर हे दोघेही एका गाडीतून प्रवास करत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पामेला गोस्वामी यांच्या बॅग आणि कारमधून १०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे न्यू अलीपूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पामेला गोस्वामी यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दावा केला आहे की, पामेला गोस्वामी या ड्रग्ज तस्करीत सहभागी असल्याचा दाट संशय होता. आम्हाला माहिती मिळाली होती की पामेला आपल्या मित्रासोबत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी जात आहे ही माहिती मिळताच आम्ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. राजकीय नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. ड्रग्जचं जाळं हे बॉलिवूड सेलिब्रेटींपासून आता राजकीय नेत्यांपर्यंत असल्याचंही समोर येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. आगामी निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि त्याच दरम्यान ही घटना समोर आली आहे.