Black Alien : फ्रान्समधला एक हौशी कलाकार स्वतःचं रुपांतर ‘ब्लॅक एलियन’मध्ये करण्याच्या प्रक्रियेत आहे. त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत असून त्याने आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू काढले आहेत. त्याच्या शरीराला टॅटूंनी असं काही व्यापून टाकलं आहे की त्याची खरी त्वचाही दिसत नाही. मात्र त्याच्या या अवतारावरून लोक त्याच्याबाबत गैरसमज करून घेत असल्याचं चित्र आहे. आपलं रुप पाहून कुणीच आपल्याला नोकरी देत नसल्याचं दुःख त्यानं व्यक्त केलं आहे. त्याने आपल्या डोक्यावर, पोटावर, छातीवर, पायावर, हातांवर एवढंच नव्हे तर बुब्बुळांवरदेखील टॅटू काढले आहेत. अँथनी लोफ्रेडो असं या अवलियाचं नाव.
आपलं शरीर हा एक प्रकल्प असल्याचं अँथनीचं म्हणणं आहे. त्यामुळे तो सतत आपल्या शरीरावर वेगवेगळे प्रयोग करत असतो. या प्रयोगाबाबतचे अपडेट्स तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअरही करत असतो. त्याने स्वतःला एलियनप्रमाणे विचित्र बनवण्यासाठी एका हाताची दोन बोटं कापून टाकली आहेत. आपला हात प्राण्यांच्या पंज्याप्रमाणे दिसावा, यासाठी त्याने हे वेदनादायी निर्णय घेतला होता.
आपल्या नव्या लुकमुळे आपली भलतीच पंचाईत होत असल्याचं अँथनीनं म्हटलं आहे. Club 113 नावाच्या एका पॉडकास्टमध्ये त्याने आपली कैफियत मांडली आहे. आपल्याला या लूकमध्ये अनेकदा निगेटिव्ह प्रतिक्रिया येत असल्याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. आपल्याला पाहिल्यानंतर अनेकजण घाबरतात, किंचाळतात आणि दूर पळून जातात, असं तो सांगतो. आपण पृथ्वीवरील मानव प्राणी नसून भलतेच कुणीतरी आहोत, असा अनेकांचा समज होतो. मात्र मी तुमच्यासारखाच एक माणूस आहे, असं आवाहन त्याने केलं आहे.
अधिक वाचा - CBSE Result 2022 : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, असा बघा निकाल
अँथनी म्हणतो, “माझ्या या अवतारामुळे मला कुणीच नोकरी देत नाही. माझ्यातील केवळ निगेटिव्ह बाजू पाहिली जाते. एखाद्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला कसं वाटतं, या एकमेव निकषावर नोकरी द्यायची की नाही, हे ठरवलं जाणं चूक आहे. त्यामुळे आपला माणूस म्हणून विचार व्हावा आणि नोकरी मिळावी.”
अधिक वाचा - Elon Musk in making : आणखी काही मस्क जन्मणार? एलॉनच्या वडिलांना शुक्राणू दान करण्याची ऑफर
मला रोज नवनवे लोक पाहतात आणि प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. केवळ काही लोकांना समजावून माझ्या आयुष्यात फरक पडणार नाही, हे मला समजलं आहे, असं अँथनी म्हणतो. प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यावं, ही अपेक्षाच चुकीची असल्याचंही त्याने मान्य केलं आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा लोक पाहतात, तेव्हा प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. त्यांना समजून घेणं मलाही शक्य नाही. तेव्हा मला त्यांनी समजून घ्यावं, अशी अपेक्षा बाळगणं चुकीचं असल्याचं तो मान्य करतो. जेव्हा जेव्हा लोक मला पाहून घाबरतात, तेव्हा मी स्वतःच तिथून बाजूला होतो, असंही तो सांगतो.