इस्लामाबाद : पाकिस्तानात (Pakistan) युनिसेफच्या (UNICEF) एका महिला अधिकाऱ्यावर बलात्कार (Rape) झाला आहे. या प्रकरणी तिच्या अंगरक्षकाला (bodyguard) अटक करण्यात आली आहे. सदर 27 वर्षीय महिला अधिकारी स्वीडनची असून, तिची मार्च महिन्यात इस्लामाबादला पोस्टिंग झाली होती. ती पाकची राजधानी इस्लामाबादच्या चोख सुरक्षा असणाऱ्या पॉश भागात एकटी राहते.या प्रकरणी पाक सरकारने अद्याप कोणतेही निवेदन जारी केले नाही. राजकीय दबावामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्न करत आहेत.
जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार, ही स्विडीश महिला इस्लामाबादच्या पॉश G6/4 भागात एकटी राहते. ती मार्चमध्ये स्वीडनहून पाकिस्तानात बदलीवर आली होती. तिने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती बुधवारी रात्री लवकर झोपली. रात्री 11.30 च्या सुमारास कुणीतरी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी रुमचे दिवे बंद होते. त्यामुळे अंधारात मला काहीच दिसले नाही. तेव्हा एका व्यक्तीने मला पाठीमागून पकडून पूर्ण ताकदीने माझे तोंड दाबले. त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला. माझा जीव गुदमरत होता. मी हात जोडून त्याला वॉशरुममध्ये जाण्याची परवानगी मागितली. त्यावेळी मला बलात्काऱ्याचा चेहरा दिसला. तो माझा अंगरक्षक होता.
दरम्यान, पीडित महिला अधिकाऱ्याने पोलिसांत गुन्हा दाखल केला. पण, इस्लामाबाद पोलिस व गृह मंत्रालयाने अद्याप या प्रकरणी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीला अटक करुन त्याची गुप्त ठिकाणी चौकशी केली जात आहे. युनिसेफनेही आतापर्यंत याची कोणतीही माहिती दिली नाही.