Brazil Ex President Supporters Raid Congress and Supreme Court : ब्राझीलमध्ये (Brazil) धुमाकूळ सुरू आहे. माजी अध्यक्ष जायर बोल्सोनारो (Jair Bolsonaro or Jair Messias Bolsonaro) यांच्या समर्थकांनी देशाच्या संसदेत, राष्ट्रपती भवनात आणि सुप्रीम कोर्टात घुसखोरी केली आहे. सुरक्षा यंत्रणेने सरकारी इमारतींच्या आवारात लावलेले बॅरिकेड्स तोडून अथवा बाजुला ढकलून बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी घुसखोरी केली. काही ठिकाणी घुसखोरांनी तोडफोड आणि नासधूस पण केली. संसदेत घुसखोरी करणाऱ्यांपैकी काही जणांनी अध्यक्षांच्या आसनावर उभे राहून उड्या मारण्याचा उद्योग केला आहे.
सरकारी इमारतींवर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे झेंडे लावले आहेत. घुसखोरी करणाऱ्यांनी हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे कपडे पण परिधान केले होते.
ब्राझीलचे विद्यमान अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा (Luiz Inácio Lula da Silva) यांनी बोल्सोनारो यांच्या समर्थकांच्या कृत्याचा निषेध केला तसेच सरकारी इमारतींमध्ये घुसखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याचा आदेश दिला. सुरक्षा यंत्रणा सरकारी इमारतींमधून बोल्सोनारो यांच्या समर्थकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. घुसखोरांना सरकारी इमारतीतून बाहेर काढण्यासाठी अश्रूधुराचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
ब्राझीलमधील घटनेने अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी संसदेत घडलेल्या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अमेरिकेत काही महिन्यांपूर्वी ट्रम्प समर्थकांनी संसदेत धुमाकूळ घातला होता. यावेळी ब्राझीलच्या संसदेत बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी धुमाकूळ घातला आहे.
देशाच्या एका भागात पूर आला आहे. या पूर स्थितीचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष गेले असताना राजधानीत माजी अध्यक्ष बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी धुमाकूळ घातला. बोल्सोनारो यांच्या समर्थकांच्या उद्योगांचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. सरकारी इमारतींमध्ये घुसखोरी करुन गोंधळ घालण्याच्या या प्रकाराचा जगातील अनेक देशांनी निषेध केला आहे. निवडणुकांचे निकाल स्वीकारुन लोकशाही मार्गाने विरोध प्रकट करा, पण सरकारी संपत्तीची नासधूस करू नका; असे आवाहन जगातील अनेक देशांनी बोल्सोनारो यांच्या समर्थकांना केले आहे.
Makar Sankranti : यंदा कधी आहे भोगी, मकरसंक्रांती आणि किंक्रांत?
याआधी 2022 मध्ये ब्राझीलमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा यांना 60 लाख 345 हजार 999 'पॉप्युलर व्होट' मिळाली तर जायर बोल्सोनारो यांना 58 लाख 206 हजार 354 'पॉप्युलर व्होट' मिळाली. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा आणि जायर बोल्सोनारो यांच्या समर्थकांमध्ये धुसफूस सुरू आहे. पण रविवार 8 जानेवारी 2023 रोजी बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी थेट सरकारी इमारतींमध्ये घुसखोरी केली.