Robber Bride : मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदूरमध्ये (Indore) राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला (Businessman) मॅट्रिमोनियल साईटच्या (Matrimonial site) माध्यमातून लग्न करणं चांगलंच महागत पडलं. सध्या अनेकजण लग्नाचा जोडीदार निवडण्यासाठी मॅट्रिमोनिअल साईटचा आधार घेतात. त्यावर जोडीदार निवडण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि आपल्याला हवा तसा जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ऑनलाईन ओळख झाल्यानंतर प्रत्यक्ष गाठीभेठी होतात आणि त्यानंतर लग्न ठरवलं जातं. मात्र एखाद्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीची पूर्ण खातरजमा न करता त्या व्यक्तीनं सांगितलेल्या गोष्टींवर आंधळेपणानं विश्वास ठेवला, तर काय होऊ शकतं, हे मध्यप्रदेशात घडलेल्या घटनेवरून दिसून आलं आहे. एका घटस्फोटित महिलेनं व्यापाऱ्यासोबत युरोपचा दौरा करून आल्यावर त्याच्या घरचे दागदागिने चोरून धूम ठोकली आहे.
मध्यप्रदेशात इंदूरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. त्यानंतर काही कारणामुळे त्याचा घटस्फोट झाला होता. दुसऱ्या लग्नासाठी तो प्रयत्न करत होता. Shadi.com या बेवसाईटवर त्याने आपल्यासाठी जोडीदार निवडायला सुरुवात केली होती. त्याच्याशी एका महिलेनं संपर्क साधला. आपण घटस्फोटित असल्याचं सांगून आपल्याला दुसरं लग्न करण्याची इच्छा असल्याचं या महिलेनं व्यापाऱ्याला सांगितलं. व्यापाऱ्यालाही मुलगी आवडल्यामुळे त्यांनी एकत्र भेटण्याचं ठरवलं.
पहिल्या काही भेटीगाठीत दोघांचं सूत जुळलं आणि पुढचं आयुष्य दोघांनी एकत्र जगण्याच्या आणाभाका घेत त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही दुसरं लग्न असल्यामुळे साध्या पद्धतीनं लग्न आटोपलं आणि नव्या संसाराला सुुरुवात केली. लग्नानंतर तीन महिने सगळं काही आलबेल सुरू होतं. व्यापाऱ्याने आपल्या पत्नीसह युरोप सहल करण्याचा निर्णय घेतला. ते ऐकून पत्नीलाही आनंद झाला आणि दोघंही युरोपच्या दौऱ्यावर गेले. सुमारे दोन आठवडे युरोप फिरून झाल्यावर ते पुन्हा इंदूरला आले.
अधिक वाचा - Manish Sisodia यांच्यावर अटकेची तलवार, जाणून घ्या काय असते Lookout नोटीस
घरी आल्यानंतर मात्र पत्नीचा नूर हळूहळू बदलू लागल्याचं व्यापाऱ्याच्या लक्षात आलं. मात्र तिचा स्वभावच असावा, असं गृहित धरून तो तिच्या कलाने घेत राहिला. एक दिवस किरकोळ कारणावरून कडाक्याचं भांडण काढत पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी नेमका प्रकार व्यापाऱ्याच्या लक्षात आला. घर सोडताना तिने घरातील पूर्वजांपासून चालत आलेले आणि नव्याने खरेदी केलेले असे सुमारे 50 लाख रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला होता. पत्नी घरातून निघून गेल्यानंतर तिचा पत्ताही लागत नव्हता. तिचा मोबाईलही नॉट रिचेबल येत होता. दोन दिवस काहीच संपर्क होत नसल्याचं लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचं व्यापाऱ्याच्या लक्षात आलं आणि त्याने पोलीस स्टेशनला धाव घेतली.
अधिक वाचा - Terrorist attack alert:Punjab मध्ये दहशतवादी हल्ल्याचा इशारा; ISI रचतेय चंदीगड, मोहालीमध्ये हल्ल्याचा कट
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून तरुणीने बनावट प्रोफाईल तयार करून मॅट्रिमोनिअल साईटवर टाकल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आहे. लवकरच तरुणीला अटक केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.