चीनला धक्का, मनाली-लेह महामार्ग अंतिम टप्प्यात

BRO's new highway untraceable by enemy चिनी सैन्याला पत्ता लागू न देता मनालीतून लेहपर्यंत सैन्याची वाहतूक सहज करण्यासाठी भारताने नवा महामार्ग तयार केला.

BRO's new highway untraceable by enemy
चीनला धक्का, मनाली-लेह महामार्ग अंतिम टप्प्यात 

लेह: चिनी (China) सैन्याला पत्ता लागू न देता मनालीतून लेहपर्यंत सैन्याची वाहतूक सहज करण्यासाठी भारताने (India) नवा महामार्ग तयार केला आहे. या महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम लवकरच पूर्ण होईल. हा महामार्ग अल्पावधीत भारताच्या सेवेत दाखल होईल. नव्या २८० किमी. च्या रस्त्यामुळे लेहपर्यंत लष्करी तुकड्या, शस्त्र तसेच इतर आवश्यक साहित्य यांचा पुरवठा वेगाने करणे सोपे होणार आहे. (BRO's new highway untraceable by enemy)

तणावाच्या काळात चिनी सैन्याच्या फायरिंग रेंजपासून दूर असलेला पण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ नेणारा एक महामार्ग भारताला हवा होता. ही गरज पूर्ण करण्यासाठी मनाली-लेह  महामार्ग (Leh Manali Highway) तयार करण्याचा निर्णय झाला. भारत-चीन यांच्यात तणाव (India-China Standoff) असताना नवा मनाली-लेह रस्ता तयार झाल्यामुळे भारताची बाजू लष्करीदृष्ट्या (Indian Army) आणखी भक्कम झाली. 

श्रीनगर-कारगिल-लेह आणि मनाली-सरचू-लेह हे दोन महामार्ग भारताकडे आहेत. मात्र हे महामार्ग आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहेत. शत्रूच्या तोफांच्या माऱ्यामुळे या रस्त्यांवरुन युद्ध काळात प्रवास करणे प्रचंड धोक्याचे आहे. या उलट नव्याने तयार होत असलेल्या मनाली-लेह महामार्गापासून पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांची फायरिंग रेंज दूर आहे. भारताच्या हद्दीत आणि भारताच्या नियंत्रणात असलेल्या भागातून हा रस्ता जातो. पाकिस्तान आणि चीनमधून या रस्त्यावरील वाहतुकीवर लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे या मार्गाने महत्त्वाची लष्करी वाहतूक सुरक्षितरित्या करुन लेह गाठणे शक्य आहे. 

लेहच्या बेस कँपपर्यंत सर्व साहित्य सहज पोहोचू शकते. तिथून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे जाणे शक्य आहे. भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या अनेक उंच डोंगरांवर भक्कम मोर्चेबांधणी केली आहे. या मोर्चेबांधणीमुळे लडाखच्या पूर्व भागातील चिनी हल्ल्यांचा धोका कमी झाला आहे. हल्ल्यांचा धोका कमी झाल्यामुळे या परिसरातून लष्करी वाहतूक करणे सोपे झाले आहे. 

नव्या मनाली-लेह महामार्गामुळे प्रवासाचे किमान पाच ते सहा तास वाचणार आहेत. जुन्या रस्त्याने किमान १२ ते १४ तासांत लेह गाठता येत होते. नव्या रस्त्यामुळे हा प्रवास अवघ्या पाच चे सहा तासांमध्ये पूर्ण होणार आहे. या रस्त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाकीच्या दोन्ही रस्त्यांवर थंडीच्या दिवसांत प्रवास करणे कठीण आहे. मात्र नव्या मनाली-लेह महामार्गावर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी प्रवास करणे शक्य आहे. 

लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (Border Roads Organisation - BRO) तयार केलेल्या मनाली-लेह या २८० किमी. च्या रस्त्यावरुन अवजड लष्करी वाहनांची वाहतूक सहज शक्य आहे. कित्येक टन वजनाचे ट्रक या महामार्गावरुन सहज प्रवास करू शकतात. 

सीमेपासून ३० किमी दूर असल्यामुळे शत्रू या रस्त्यावर सहजतेने लक्ष ठेवू शकत नाही. कोणताही धोका नसल्यामुळे या मार्गाने वेगाने आणि निश्चिंतपणाने लष्करी वाहतूक शक्य आहे.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने नव्या मनाली-लेह रस्त्याचे २५८ किमी. चे पूर्ण केले आहे. बाकीच्या भागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी पर्यायी मार्गांद्वारे प्रवास सुरू आहे. जो रस्ता पूर्ण झाला आहे त्या भागाचा वापर सैन्याने सुरू केला आहे. लष्कर प्रामुख्याने मालवाहतूक आणि सैनिकांच्या वाहतुकीसाठी नव्या मनाली-लेह रस्त्याचा वापर करत आहे. 

याआधी कारगिल युद्धाच्या काळात सुरुवातीला डोंगरांवर पाकिस्तानचे सैनिक दहशतवाद्यांच्या वेषात लपून बसले होते. जोझिला खिंडीतून सुरू होणाऱ्या आणि द्रास-कारगिलमार्गे लेहपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पाकिस्तानच्या शस्त्रांमुळे गंभीर धोका निर्माण झाला होता. या संकटातून धडा घेत भारताने रस्त्यांचा दर्जा सुधारणे, शत्रूपासून सुरक्षित अंतर राखून प्रवास करणे या पर्यायांचा अवलंब सुरू केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी