Budget Session 2022 From Monday : नवी दिल्ली: सोमवार (Monday) म्हणजेच आजपासून संसदेचं (Parliament) अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशन सत्र (Budget Session 2022) सुरू होत आहे. या वर्षातील पहिले अधिवेशन (Session) असल्यानं परंपरेनुसार राष्ट्रपतींच्या (President) अभिभाषणाने (Speech) हे सत्र सुरू होईल. मंगळवारी (Tuesday) बजेट (Union Budget 2022) सादर केला जाणार आहे. या सत्रापूर्वी स्पाय सॉफ्टवेअर पेगासस (Pegasus Spyware) भारताने खरेदी केलं होतं, याबाबतील वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स' या अमेरिकन वृत्तपत्रात (American Newspaper) आलं आहे, यामुळे राजकीय पारा चांगलाच तापला आहे. विरोधक आक्रमक झाले असून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या विचारत आहे.
विरोधकांची भूमिका कडक असून या मुद्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत केंद्राला घेराव घालणार आहे. जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणार असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. पेगाससशिवाय शेतकऱ्यांचा मुद्दा, महागाई, एअर इंडियासह सार्वजनिक उपक्रमांची विक्री आणि कथित चिनी घुसखोरी या मुद्द्यांवरही विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात येणार आहे. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. गेल्या पावसाळ्यातही पेगासस हेरगिरीवरून बराच गदारोळ झाला होता. या गोष्टीची झलक रविवारी दिसली,
रविवारी जेव्हा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नोटीस बजावली होती. चौधरी म्हणाले, “पावसाळी अधिवेशनात वैष्णव यांनी सभागृहात सांगितले होते की, भारत सरकारचा पेगाससशी काहीही संबंध नाही किंवा सरकारने तो विकत घेतलेला नाही. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेत प्रतिज्ञापत्राद्वारे देशवासीयांची दिशाभूल केली आहे''.
दरम्यान, सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021-22 या वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान मोदी ७ फेब्रुवारीला भाषणावर चर्चेला उत्तर देतील.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाच्या आधारे पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. इस्रायलकडून गुप्तचर सॉफ्टवेअर पेगाससच्या कथित खरेदीच्या व्यवहार आणि सार्वजनिक पैशांचा गैरवापराविषयीच्या चौकशीचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. भारत आणि इस्रायलमधील 2 अब्ज डॉलरच्या करारामध्ये पेगाससच्या खरेदीचा समावेश असल्याचे अहवालात म्हटले आहे.
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी रविवारी ट्विट करून केंद्राची खिल्ली उडवली. त्यांनी लिहिले की इस्त्राईलकडे पेगासस स्पायवेअरची प्रगत आवृत्ती आहे का हे विचारण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. इस्रायलसोबतच्या भारताच्या ३० वर्षांच्या राजनैतिक संबंधांबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हे संबंध पुढे नेण्यासाठी नवीन उद्दिष्टे ठेवण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मोदींच्या या विधानावरुन काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी भाजपला कोपरखळी मारली आहे. तर प्रियांका गांधी म्हणाल्या, तरूणांना रोजगार देण्याऐवजी नागरिकांची हेरगिरी करण्याला भाजप सरकारचे प्राधान्य आहे.