...म्हणून ११ जणांनी केली सामूहिक आत्महत्या!

दिल्लीतील बुराडी येथे एका घरात ११ मृतदेह आढळले होते. पोलिसांनी हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे मत नोंदवत तपास बंद करण्याची तयारी सुरू केली आहे.

Burari Deaths Case Reason Police Closure Report Says No Foul Play In House Of Horror
...म्हणून ११ जणांनी केली सामूहिक आत्महत्या! 
थोडं पण कामाचं
  • ...म्हणून ११ जणांनी केली सामूहिक आत्महत्या!
  • दिल्लीतील बुराडी येथे एका घरात ११ मृतदेह आढळले होते
  • पोलिसांनी त्यांचा 'क्लोझर रिपोर्ट' न्यायालयाला सादर केला

नवी दिल्ली: दिल्लीतील बुराडी येथे एका घरात ११ मृतदेह आढळले होते. सर्वजण एकाच कुटुंबाचे सदस्य होते. या प्रकरणात पोलिसांनी आधी हत्येच्या संशयावरुन एफआयआर नोंदविण्याचा निर्णय घेतला. मात्र तीन वर्षांनंतर पोलिसांनी हे सामूहिक आत्महत्येचे प्रकरण असल्याचे मत नोंदवत तपास बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी त्यांचा 'क्लोझर रिपोर्ट' ११ जून रोजी न्यायालयाला सादर केला आहे. न्यायालय नोव्हेंबर महिन्यात निर्णय देईल. Burari Deaths Case Reason Police Closure Report Says No Foul Play In House Of Horror

बुराडी प्रकरणाची सुरुवात १ जुलै २०१८ रोजी सकाळी झाली. पोलिसांना नारायण देवी यांचा मृतदेह जमिनीवर आढळला तर इतर दहा जणांचे मृतदेह घरातील एका लोखंडी ग्रिलला लटकलेल्या अवस्थेत आढळले. सर्वांच्या डोळ्यांवर पट्टी होती आणि हात-पाय बांधलेले होते. नारायण देवी, त्यांचे दोन मुलगे भवनेश चुंडावत आणि ललित चुंडावत, मुलगी प्रतिभा, भवनेशची पत्नी सविता, भवनेश-सविताची तीन मुलं नीतू, मोनू आणि ध्रुव, ललितची पत्नी टिना, ललित-टिनाचा मुलगा शिवम आणि प्रतिभाची मुलगी प्रियांका यांचे मृतदेह पोलिसांना आढळले.

पोलिसांना घरात एक डायरी आढळली. या डायरीतील अनेक नोंदी या ललित चुंडावत आणि प्रतिभाची मुलगी प्रियांका यांनी केल्या होत्या. यातही ललितने जास्त नोंदी केल्या होत्या. डायरीतील नोंदींप्रमाणेच मृतदेह आढळले होते. हस्ताक्षर तज्ज्ञाने ललित आणि प्रियांकाच्या अक्षरातील इतर कागदपत्रे आणि डायरीतील नोंदींची पडताळणी करुन त्यांचा अहवाल पोलिसांना दिला होता. 

तपासात पोलिसांना घरातील देवांसमोर एक बॅग आढळली. या बॅगेत घरातल्या सदस्यांचे मोबाइल सायलेंट मोडवर ठेवल्याचे आढळले. डायरीतील नोंदींनुसार घरातील सदस्य एक काळी जादू करत होते. विशिष्ट विधी करुन ते नारायण देवी यांचे पती भोपाळ सिंह यांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. ललितने केलेल्या नोंदींवरुन पोलिसांना काही बाबी लक्षात आल्या.

आपण वडिलांच्या आत्म्याशी संवाद साधत आहोत आणि एक विधी केला की कुटुंबातील सर्व सदस्यांना मोठा लाभ होईल असा ठाम विश्वास ललितला वाटत होता. हा विधी करण्यासाठी त्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना तयार केले होते. या संदर्भात त्याने डायरीत स्पष्ट नोंद केल्याचे दिसले. डायरीतील नोंदी, घरात आढळलेल्या मृतदेहांची स्थिती आणि मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल (पोस्टमॉर्टेम रिपोर्ट) यातून अंधविश्वास सामूहिक आत्महत्येचे कारण असल्याचे दिसत आहे. मृतावस्थेत आढळलेल्यांपैकी कोणीही विधीला विरोध केल्याचे अथवा विरोधासाठी संघर्ष केल्याचे ठोस पुरावे पोलिसांना सापडलेले नाही. तसेच मृतांच्या शरीरात विष आढळलेले नाही. यामुळे २००७ मध्ये मृत्यू झालेल्या वडिलांच्या आत्म्याशी संवाद साधण्याचा उद्योग कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्याची अखेर करण्यास कारणीभूत ठरल्याचे तपासात आढळले. तपासात आढळलेल्या बाबींच्या आधारे पोलिसांनी त्यांचा 'क्लोझर रिपोर्ट' ११ जून रोजी न्यायालयाला सादर केला आहे. न्यायालय नोव्हेंबर महिन्यात निर्णय देईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी