नवी दिल्ली : लग्नाच्या वादावरून दिल्लीत एका व्यापाऱ्याची त्याच्या प्रेयसीच्या मंगेतर कडून हत्या करण्यात आली. यानंतर, त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला गेला आणि गुजरातच्या भरुचमध्ये रेल्वेमधून फेकून देण्यात आला. नीरज गुप्ता (वय ४६) असे मृताचे नाव आहे. त्याचे त्याच्या स्टाफमधील एका मुलीसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर होते. गुप्ता हे मॉडेल टाऊनमधील रहिवासी होते.
पोलिसांनी सांगितले की, तिन्ही आरोपी फैसल (२९), तिची आई शाहीन नाझ (४५) आणि तिचा मंगेतर जुबेर (वय २८) यांना अटक करण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला वायव्य दिल्लीतील फैसलच्या घरात गुप्ताचे आणि फैसलचे भांडण झाले. गुप्ता यांनी लग्नाला आक्षेप घेतला. पोलिसांनी पुढे खुलासा केला की, गुप्ताच्या प्रेयसीच्या मंगेतरने गुप्ता यांच्यावर वीटेने हल्ला केला. त्याच्या पोटात चाकूने वार देखील करण्यात आले आणि त्याचा घसा कापण्यात आला. नंतर, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गुप्ताच्या प्रेयसीने आणि तिच्या आईने मुख्य आरोपीला मदत केली.
गुप्ता आदर्श नगरमधील केवल उद्यानातून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. फैसल आणि गुप्ता यांचे दीर्घकाळचे संबंध असल्यामुळे आपल्या पतीच्या गायब होण्यामागे फैसलचा हात असावा संशय गुप्ताच्या पत्नीने पोलिसांसमोर व्यक्त केला. तिच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता कलम ३६५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि फैसलची चौकशी करण्यात आली.
चौकशी दरम्यान फैसलने उघड केले की ती गुप्तासाठी काम करीत होती आणि गुप्ता गेल्या १० वर्षांपासून तिच्याशी विवाहबाह्य संबंधात होता. तिच्या आई-वडिलांची अशी इच्छा होती की तिने जुबेरशी लग्न करावे. जेव्हा तिने हे गुप्ताला सांगितले तेव्हा त्याने तिच्या लग्नाला नकार दिला आणि जुबेर, फैसल आणि तिच्या आईशी वाद घालण्यासाठी तिच्या घरी आला. भांडणाच्या वेळी गुप्ताने फैसलला धक्का दिला, त्यामुळे जुबेर चिडला आणि त्याने हल्ला करुन त्याला ठार मारले. गुप्ताची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि कॅबने निजामुद्दीन रेल्वे स्थानकात पोहोचला. रेल्वे पँट्रीमध्ये काम करणारा जुबेर सूटकेससह राजधानी एक्स्प्रेसमध्ये चढला आणि त्याने गुजरातमधील भरुचजवळ मृतदेह फेकला.
या गुन्ह्यात वापरलेला चाकू व वीट जप्त करण्यात आली असून मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास सुरू आहे.