Case against MLA | तरुणीला लग्नाचं वचन देऊन लग्नाच्या दिवशी मात्र गैरहजर राहिलेल्या आमदार महोदयांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रेमाच्या आणाभाका घेऊन शेवटच्या क्षणी आमदार प्रियकरानं पाठ फिरवल्यामुळे तरुणीला जबर मानसिक धक्का बसला. त्यानंतर तिनं थेट पोलिसांत धाव घेत आमदाराविरुद्ध तक्रार दिली आणि गुन्हा दाखल केला. ओरिसातील बिजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास यांच्याविरोधात सध्या गुन्हा दाखल झाला असून आपला यात काहीही दोष नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बिजू जनता दलाचे आमदार विजय शंकर दास यांनी एक महिन्यापूर्वी स्वतःच रजिस्टर लग्न करण्यासाठी अर्ज दिला होता. शुक्रवारी जगतसिंहपूर येथील सब रजिस्ट्रार कार्यालयात ते रजिस्टर पद्धतीनं लग्न करणार होते. त्यांची प्रेयसी सोमालिका ठरलेल्या वेळेत कार्यालयात पोहोचल्या. मात्र तिथं पोहोचल्यावर त्यांना धक्का बसला. आमदार महोदय लग्नाला हजर नव्हतेच, पण येतील याच्या कुठल्याही खाणाखुणा दिसत नव्हत्या. आमदारांच्या वतीने एकही नातेवाईक किंवा मित्र त्या ठिकाणी हजर नव्हता. ठरलेल्या ठिकाणी त्यांनी तब्बल तीन तास वाट पाहिली. तरीही आमदार प्रियकराचा पत्ता नव्हता. वाट पाहून त्यांनी रजिस्ट्रार ऑफिसमधून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
अधिक वाचा - Owaisi on Nupur Sharma : नुपूर शर्मा होऊ शकतात दिल्लीच्या मुख्यमंत्री, असदुद्दीन ओवैसींचा टोला
वचन देऊनही आमदार स्वतःच्या लग्नाला हजर न राहिल्यामुळे तरुणीच्या रागाचा पारा चांगलाच चढला. थेट पोलीस स्टेशन गाठून आमदाराविरोधात त्यांनी तक्रार नोंदवली. गेल्या तीन वर्षांपासून आपले आणि दास यांचे संबंध असल्याचा उल्लेख तरुणीने तक्रारीत केला आहे. दास यांनी आपला विश्वासघात घेतला असून लैंगिक शोषण केल्याचा आरोपही तरुणीने केला आहे. विजय दास यांनी आपला शब्द पाळला नसून गेल्या कित्येक दिवसांपासून ते आपला फोन उचलत नसल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांनाही आमदारांकडून धमक्या येत असल्याचा आरोप तिने केला आहे.
सोमालिकाने म्हटलं आहे की आम्ही 17 मे रोजी सब रजिस्ट्रार कार्यालयात लग्न रजिस्टर करण्यासाठी अर्ज केला होता. विजयने मला शब्द दिला होता. आपण रजिस्टर लग्न करून नव्या संसाराला सुरुवात करू, असं स्वप्न त्यानं दाखवलं होतं. रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करतानाही तो माझ्यासोबतच होता. मात्र त्यानंतर काय घडलं आपल्याला माहित नाही. लग्नाच्या ठरलेल्या दिवशी तो आलाच नाही. त्यामुळे आपल्याला जबर धक्का बसला.
आमदार दास यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. रजिस्ट्रेशनसाठी अर्ज केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांत लग्नाचं रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याची मुभा असते. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे अजून 60 दिवस बाकी आहेत. शुक्रवारी लग्न रजिस्टर करायचं असल्याबाबत आपल्याला कुठलीही सूचना मिळालेली नव्हती. अन्यथा आपण वेळेवर हजर राहिलो असतो, असा खुलासा त्यांनी केला आहे.