Rahul Gandhi ED Enquiry : रेणुका चौधरींनी पकडली पोलिसाची कॉलर, कारणाचाही केला खुलासा, गुन्हा दाखल

राहुल गांधींच्या ईडी चौकशीविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी पोलिसाची कॉलर पकडल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gandhi ED Enquiry
रेणुका चौधरींनी पकडली पोलिसाची कॉलर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • रेणुका चौधरींनी पकडली पोलिसाची कॉलर
  • पाय अडकून पडत असताना तोल सावरण्यासाठी कॉलर पकडली - चौधरी
  • रेणुका चौधरींविरोधात गुन्हा दाखल

Rahul Gandhi ED Enquiry : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात केंद्र सरकार नाहक गुंतवत असल्याचा दावा करत काँग्रेसनं देशभर आंदोलन सुरु केलं आहे. याच आंदोलनादरम्यान काँग्रेस नेत्या रेणुका चौधऱी यांनी पोलिसाची कॉलर पकडल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलन करत असताना एका क्षणी त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली. त्यानंतर रेणुका चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंडविधानाच्या कलम 151, 140, 147, 149, 341 आणि 353 नुसार हे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. 

तोल सांभाळण्यासाठी पकडली कॉलर

आंदोलन करत असताना पोलिसांच्या गराड्यात आपण संघर्ष करत होतो. यावेळी आपणास पोलीस मागे ढकलत होते. मागे जाताना आपला पाय अडकून आपण खाली पडणार होतो. त्यामुळे तोल सावरण्यासाठी आपण समोर असणाऱ्या पोलिसाचा आधार घेतला, असं चौधरी यांनी म्हटलं आहे. तो एक तरुण पोलीस कर्मचारी होता आणि तो मला ढकलतही नव्हता. तो त्याचं कर्तव्य बजावत होता. मात्र एका क्षणी माझा पाय अडकल्यामुळे मी खाली पडणार होते. स्वतःला सावरण्यासाठी त्यावेळी पोलिसाची कॉलर पकडावी लागली, असं त्यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा - चिंतन शिबिरानंतर काॅंग्रेस संघटनेत बदल, मिडिया प्रभारी पदावर माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांंची निवड

माफी मागण्याची तयारी

पोलिसाची कॉलर नाईलाजाचं पकडावी लागली, त्यामागे इतर कुठलाही हेतू नव्हता, असं रेणुका चौधरी यांनी म्हटलं आहे. या प्रकाराबद्दल आपण त्या तरुण कर्मचाऱ्याची माफी मागायला तयार आहोत, मात्र त्याचवेळी आपल्यावर नाहक दादागिरी करणाऱ्या पोलिसांनी आपली माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्याभोवती पुरुष पोलिसांचा एवढा प्रचंड गराडा का घालण्यात आला होता, याचं उत्तर प्रशासनानं देण्याची गरज आहे, अशी मागणीही रेणुका चौधरी यांनी केली आहे. 

देशभर आंदोलन

बंद करण्यात आलेली नॅशनल हेराल्ड प्रकरणाची फाईल पुन्हा उघडल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. केंद्रीय यंत्रणांचा जाणीवपूर्वक गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. आपण काहीच गुन्हा केला नसल्याने सर्व प्रकारच्या चौकशीला आपण सामोरे जाण्यास तयार आहोत, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळेच दिल्लीसह देशातील वेगवेगळ्या राज्यांत काँग्रेसचे नेते आंदोलन करत आहेत. हैदराबादसोबतच दिल्ली, कर्नाटक, केरळ, पंजाब, तेलंगणा, तमिळनाडू आणि राजस्थानमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली.

अधिक वाचा - "पोलिसांनी महिला खासदाराचे फाडले कपडे", शशी थरूर यांनी शेअर केला व्हिडिओ

काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संलग्न असणारे हे वृत्तपत्र 2008 सालापर्यंत काँग्रेसशी संलग्न होते. 1 एप्रिल 2008 साली हे वृत्तपत्र तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींनी केली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक फेरफार झाल्याची तक्रार केली होती. या वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेकडे होती. या संस्थेकडून यंग इंडिया लिमिटेड या संस्थेने वृत्तपत्राचा ताबा घेतला. या संस्थेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के मालकी आहे. या व्यवहार 90 कोटी रुपयांना झाला. वास्तविक, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या या वृतपत्राचा व्यवहार केवळ 90 कोटीत झाल्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी