नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेची तारीख नुकतीच जारी करण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता दहावीची पहिल्या सत्राची परीक्षा 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. तर इयत्ता बारावीच्या टर्म पहिल्या परीक्षा 1 डिसेंबरपासून सुरू होईल. परीक्षेचे वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.
जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक प्रमुख विषयांसाठी (मेजर सब्जेक्ट्स) असून, इतर विषयांचे वेळापत्रक शाळांना स्वतंत्रपणे पाठवले जाईल, असे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले. दहावी व बारावीच्या ‘मायनर सब्जेक्ट्स’च्या परीक्षा अनुक्रमे १७ व १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. शैक्षणिक सत्राचे द्विभाजन, दोन सत्रांत परीक्षा आणि अभ्यासक्रमाचे सुसूत्रीकरण हा २०२१-२२ या वर्षात दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजनेचा भाग होता.
स्टेप 1: सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- cbse.nic.in ला भेट द्या .
स्टेप 2: त्यात Whats New याच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: 10 वी किंवा 12 वीच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: आता एक पीडीएफ उघडेल, ते डाऊनलोड करा.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरू करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. नेहमी परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरु होत असते. मात्र, थंडीचा विचार करता ही परीक्षा सकाळी 11.30 वाजता सुरु होईल. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी 20 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.
सीबीएसई बोर्डानुसार, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. बोर्डाने टर्म -1 परीक्षेत 50 टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर तयार केले जातील. कोरोना संसर्गाची स्थिती कमी झाल्यास यंदाच्या दोन्ही सत्राच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीन घेतल्या जाणार आहेत.
सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म वन म्हणजेज पहिल्या सत्राची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत.