[VIDEO] लायब्ररीत शांतपणे अभ्यास करणाऱ्या मुलांना पोलिसांची बेदम मारहाण, सीसीटीव्हीमुळे पोलिसांची पोलखोल 

१५ डिसेंबरच्या रात्री दिल्ली पोलिसांनी जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. ज्याचा व्हिडिओ तब्बल दोन महिन्यांनी समोर आला आहे  

cctv footage has emerged showing police assaulting jamia students without provocation
[VIDEO] लायब्ररीत शांतपणे अभ्यास करणाऱ्या मुलांना पोलिसांची बेदम मारहाण, सीसीटीव्हीमुळे पोलिसांची पोलखोल   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) विरोध करणाऱ्या जामिया मिल्लिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांवर १५ डिसेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. लायब्ररीत बसलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक मारहाण केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांवर करण्यात आला होता. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी असा दावा केला होती की पोलीस लायब्ररीच्या आत घुसखोरांचा पाठलाग करताना घुसले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केलेली नव्हती.  परंतु घटनेच्या ६० दिवसानंतर म्हणजे जवळजवळ दोन महिन्यांनी आता एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामुळे पोलिसांनी केलेला दावा फोल ठरला आहे. ज्यामध्ये शांतपणे अभ्यास करत बसलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस अमानुषपणे मारहाण करत असल्याचं दिसतं आहे. 

मिळालेल्या माहितूनुसार, जामिया समन्वय समितीने हा व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचं समजतं आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की विद्यार्थी लायब्ररीत शांततेने अभ्यास करीत होते. अशा परिस्थितीत, दिल्ली पोलिसांचे जवान गणवेश आणि हेल्मेट घालून थेट जुन्या लायब्ररीत पोहचतात आणि अचानक तिथे अभ्यास करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरवात करतात. यानंतर तिथे एकच पळापळी सुरु होते. दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं आणि विद्यार्थी लाठीहल्ल्यापासून वाचण्यासाठी पळून जात असल्याचं दिसतं आहे.

दिल्ली पोलिसांच्या या कारवाईदरम्यान अनेक विद्यार्थी जखमी झाले. एका विद्यार्थ्याला तर आपवा डोळा देखील गमावावा लागला. अशा परिस्थितीत दोन महिन्यांनंतर समोर आलेल्या या व्हिडिओने पोलिसांच्या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी असं म्हटलं आहे की, ते यासंबंधी चौकशी करत आहेत.

दिल्ली पोलीस विशेष आयुक्त (गुन्हे) प्रवीर रंजन यांनी याबाबत बोलताना असं म्हटलं की, 'आम्ही नुकताच समोर आलेल्या १५ डिसेंबरच्या सीसीटीव्ही व्हिडिओबाबत माहिती घेतली आहे. जो जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाच्या लायब्ररीतला असल्याचं समजतं आहे. सध्या आम्ही याची चौकशी करत आहोत.'

जामिया प्रशासनातर्फे परवानगी न घेता महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आत जामिया विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाकडून दिल्ली पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी