नवी दिल्लीः भरतीसाठी इच्छुक तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) आज अग्निपथ भरती (Agneepath Recruitment) योजनेची घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री (Union Minister of Defense) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ही घोषणा जाहीर केली असून या योजनेअंतर्गंत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. तसंच, तरुणांना रोजगारही दिला जाणार आहे. या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना 'अग्नवीर' असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही दलाचे प्रमुखांसह या योजनेचा आज घोषणा केली आहे. भारतीय सैन्याला जगातील सर्वश्रेष्ठ सेना बनवण्यासाठी सीसीएअंतर्गंत एक निर्णय घेतला आहे. आज अग्नपथाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक योजनेची घोषणा आम्ही करत आहोत. अग्निपथ योजनेअंतर्गंत अग्निवीर सेनामध्ये सेवा करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे. ही योजना देशाची सुरक्षा मजबूत करण्यासाठी व देशातील युवकांना सैन्यात भरती करण्यांच्या दृष्टीने सुरू करण्यात येत आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ योजनेमुळं तरुणांचे आरोग्य आणि फिटनेस सुधारेल. तसंच, विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे एकूण जीडीपी च्या वाढीस मदत होईल. एक उत्तम पॅकेज, सेवा निधी पॅकेज, अपंगत्व पॅकेजही जाहीर केले आहे.'टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. सैन्य भरतीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला लष्करी व्यवहार विभागाकडून नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित केली जाईल.
नव्या योजनेनुसार ही सैन्य भरती चार वर्षांसाठी असणार आहे. चार वर्षांनंतर सैनिकांच्या सेवांचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर काही सैनिकांची सेवा वाढवली जाऊ शकते. तर बाकीचे सैनिक निवृत्त होतील. या चार वर्षांच्या नोकरीमध्ये सहा आणि नऊ महिन्यांचे प्रशिक्षण देखील असणार आहे. चार वर्षांच्या निवृत्तीनंतर या सैनिकांना पेन्शन मिळणार नाही. परंतु, एकरकमी रक्कम दिली जाईल, अशी माहिती आहे.
कोणत्याही रेजिमेंटसाठी करता येणार अर्ज
विशेष म्हणजे आता लष्कराच्या रेजिमेंटमध्ये जात, धर्म आणि प्रदेशानुसार भरती होणार नाही. तर ही भरती भारतीय म्हणून होईल. म्हणजेच कोणत्याही जाती, धर्म आणि प्रदेशातील तरुण कोणत्याही रेजिमेंटसाठी अर्ज करू शकतात. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती होण्याची शक्यता आहे.