Chandrayaan-2 Landing: चंद्रापासून २.१ किमीवर विक्रम लँडरचा संपर्क तुटला, सॉफ्ट लँडिंग अपयशी

Chandrayaan 2 Landing on Moon UPDATES: चांद्रयान २ चं सॉफ्ट लँडिंग काहिसं अपयशी ठरलं आहे. चंद्रापासून अवघ्या २.१ किमी दूर असताना लँडर विक्रमचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला. त्यामुळे सॉफ्ट लाँचिंग होऊ शकलं नाही.

 ISRO_Chandrayaan_2
विक्रम लँडर प्रस्तावित मार्गावरुन भरकटलं  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • चांद्रयान २ मधील लँडर विक्रमचं सॉफ्ट लँडिंग ठरलं अपयशी
 • इस्त्रोच्या चांद्रयान २ मधील एका महत्वाच्या मिशनला धक्का
 • इस्त्रोने केलेल्या प्रयत्नांचं संपूर्ण देशात कौतुक, देशवासीय इस्त्रोच्या पाठिशी

श्रीहरिकोटा: चांद्रयान २ मधील विक्रम लँडरचं सॉफ्ट लँडिंग होऊ शकलं नाही. चंद्रापासून अवघ्या २.१ किमी दूर असतानाचा लँडरचा ऑर्बिटरशी संपर्क तुटला. त्यामुळे विक्रमचं लँडिंग होऊ शकलं की नाही याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. खरं तर भारताने एक खूप मोठा पल्ला गाठला होता. पण इतिहास रचण्यापासून इस्रो अवघं दोन पावलं लांब राहिलं. पण असं असलं तरीही संपूर्ण देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज ठामपणे इस्त्रोच्या पाठिशी उभे आहेत. लँडरचं सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतर बंगळुरु येथे कंट्रोल सेंटरमध्ये उपस्थित असणाऱ्या मोदींनी इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञांना खूप धीर दिला. तसंच आणखी प्रयत्न करत राहण्याचा सल्ला देखील दिला. 

चांद्रयान २ मधील लँडर विक्रम आणि त्याच्या आत असणारं रोव्हर प्रज्ञान हे चंद्राच्या दक्षिण धुव्रावर सॉफ्ट लँडिंग करणार होतं. पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे लँडिंग होऊ शकलं नाही. याच दरम्यान, बंगळुरुतील कंट्रोल सेंटरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. पण मिशन काहीसं अपयशी ठरल्यानंतरही मोदींनी आतापर्यंतच्या मिशनबाबत समाधान व्यक्त केलं. 

दरम्यान, चांद्रयान २ या मिशनकडे फक्त देशाचं नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. जगभरात या सॉफ्ट लाँचिंग थेट प्रक्षेपण केलं जात होतं. यामागचं कारण म्हणजे आतापर्यंत ज्या-ज्या देशांनी चांद्र मोहिमा केल्या आहेत त्या सगळ्या चंद्राच्या विषुवृत्तीय भागावर केल्या होत्या. पण भारताने पहिल्यांदाच चंद्राच्या दक्षिण धुव्रावर चांद्र मोहीम करण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दैवाने म्हणावं तसं यश आपल्याला प्राप्त झालं नाही. पण असं असलं तरीही ही मोहीम पूर्णत: अयशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण की, भारताने यानासोबत पाठवलेलं ऑर्बिटर हे अद्यापही सुस्थितीत आहे. जे चंद्राभोवती परिक्रमा करत आहे. तसंच जर लँडर सुस्थितीत असेल तर ऑर्बिटरशी पुन्हा संपर्क होऊ शकतं. त्यामुळे आता शास्त्रज्ञ त्यादृष्टीने देखील प्रयत्न करत आहेत. 

पाहा चांद्रयान २चं सॉफ्ट लँडिंग लाईव्ह 

 

LIVE UPDATE: 

 1. चंद्रापासून २.१ किमी दूर असताना लँडरशी संपर्क तुटला, नेमकं काय झालं याबाबत लवकरच माहिती घेतली जाईल: के. सिवन, इस्त्रो अध्यक्ष
 2. विक्रम लँडरशी संपर्क तुटलेला आहे: इस्रो
 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या कंट्रोल रुममधून बाहेर गेले 
 4. विक्रम लँडर प्रस्तावित मार्गावरुन भरकटलं, इस्त्रोच्या कंट्रोल रुममध्ये चिंतेचं वातावरण 
 5. विक्रम लँडर हे आता चंद्रापासून फक्त २५ किलोमीटर लांब आहे. 
 6. विक्रम लँडरने आपली गती कमी करण्यास सुरुवात केली. लँडिंगसाठी लँडरने इंजिन सुरु केले 
 7. विक्रम लँडरचं काऊंटडाऊन सुरु
 8. सॉफ्ट लँडिंगसाठी उरला अवघा १ मिनिट
 9. सॉफ्ट लँडिंगसाठी ३ मिनिटं उरली

चंद्रावरची १५ मिनिटं सर्वात महत्त्वाची 

चंद्रावरील लँडिग दरम्यानची १५ मिनिटं ही फार महत्त्वाची असतील. असं स्वत: इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी आधीच म्हटलं होतं. याच १५ मिनिटात विक्रम लँडर चंद्रावर उतरण्याची प्रकिया सुरु करण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यापर्यंत लँडरने आपला प्रवास योग्य रितीने सुरु ठेवला होता. पण अखरेच्या क्षणी लँडर हे प्रस्तावित मार्गावरुन भरकटलं

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी