Chief Minister Eknath Shinde on two day delhi visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या शासकीय भेटीवर असून आज (शनिवार ६ ऑगस्ट २०२२) त्यांचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.
आगमनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या 'आझादी का अमृतमहोत्सव राष्ट्रीय समिती'च्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसेच, उद्या रविवार (दि.७) रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या ७ व्या बैठकीत सहभागी होणार आहेत.
भंडारा व गोंदिया येथील महिला अत्याचार प्रकरणी पोलीस कसून तपास करीत आहेत. पिडीत महिलांना न्याय मिळवून देण्यात येईल. यात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळ अस्तित्वात नाहीये. त्यामुळे नागरिकांची कामे रखडून पडली आहेत. या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सातत्याने शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. त्याच दरम्यान आता मंत्र्यांचे अधिकार सचिवांकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेशच मुख्य सचिवांनी सर्व विभागाच्या सचिवांना दिलेत. यावरून उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. अर्धन्यायीक प्रकरणे वगळता मंत्री स्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत. हे अधिकार मंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळाकडेच आहेत. त्यामुळे सर्व निर्णयप्रक्रिया सचिवांच्या हातामध्ये देण्यात आली आहे हे म्हणणे पूर्णत: चुकीचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात झालेल्या २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८२ ग्रामपंचायती जिंकल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ४० तर उद्धव ठाकरेंच्या गटाने २७ ग्रामपंचायची जिंकल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने ५३, काँग्रेसने २२, इतरांनी ४७ ग्रामपंचायची जिंकल्या. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून दिली. ट्वीटमध्ये वापरलेल्या ग्राफिक्समध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळाल्या त्याची माहिती आहे. यात उद्धव ठाकरे गट असा उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गट असा उल्लेख एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना-भाजप युतीला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठे यश मिळाले म्हणून आनंद व्यक्त केला.