पाकिस्तानच्या नागरिकांना चीनमध्ये प्रवेशबंदी

पाकिस्तानला त्याच्याच मित्रांकडून जबर दणके बसत आहेत. आखाती देश, मलेशिया पाठोपाठ आता चीननेही पाकिस्तानला जबर दणका दिला.

china ban pakistan passengers and pakistan international airlines
पाकिस्तानच्या नागरिकांना चीनमध्ये प्रवेशबंदी 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानच्या नागरिकांना चीनमध्ये प्रवेशबंदी
  • मलेशियाने जप्त केले पाकिस्तानचे प्रवासी विमान
  • पाकिस्तानवर जीडीपीच्या १०७ टक्के इतके प्रचंड कर्ज

बीजिंग: पाकिस्तानला त्याच्याच मित्रांकडून जबर दणके बसत आहेत. आखाती देश, मलेशिया पाठोपाठ आता चीननेही पाकिस्तानला जबर दणका दिला. चीनमध्ये पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीची चीनला जाणारी सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. (china ban pakistan passengers and pakistan international airlines)

अमेरिकेने पाकिस्तानपासून चार हात दूर राहून भारताशी मैत्री दृढ करण्याला महत्त्व दिले आहे. सौदी अरेबियासह सर्व आखाती देशांनी पाकिस्तानला नवे कर्ज देणे थांबवून जुन्या कर्जांच्या वसुलीसाठी तगादा लावला आहे. मलेशियाने एका न्यायालयीन आदेशाचे पालन करत पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीचे (Pakistan International Airlines - PIA) एक विमान जप्त केले. पाठोपाठ चीनने पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी केली.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीने २०१५ मध्ये व्हिएतनामच्या एका कंपनीकडून बोइंग ७७७सह दोन विमानं भाडेपट्टीवर घेतली होती. या व्यवहाराचे थकीत पैसे दिले नसल्यामुळे विमान जप्तीचा आदेश देण्यात आला. या न्यायालयीन आदेशाचे पालन करत शुक्रवारी क्वालालंपूर विमानतळावर जप्तीची कारवाई करण्यात आली. क्वालालंपूर विमानतळ प्रशासनाने पाकिस्तानच्या विमानातून सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह बाहेर काढले आणि विमान जप्त केले. विमान जप्त झाल्यामुळे प्रवासी तसेच वैमानिक आणि क्रू सदस्य मिळून कंपनीचा १८ जणांचा स्टाफ अशा सर्वांना मलेशियात १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. क्वारंटाइनची मुदत संपल्यानंतर संबंधितांची सुटका होणार आहे. 

आधीच पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीच्या २६२ वैमानिकांच्या परवान्यांची चौकशी सुरू आहे. काही देशांनी पीआयएच्या विमानांवर तसेच त्यांच्या वैमानिकांवर बंदी घातली आहे. कर्जाच्या वाढत्या ओझ्याने पाकिस्तानचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या मार्गावर आहे. भरमसाठ महागाई, वस्तूंची टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे पाकिस्तानवरील संकटांमध्ये वाढ होत आहे. परिस्थिती बिकट होत असतानाच आधी मलेशियात पाकिस्तानची प्रतिष्ठी धुळीस मिळाली. जप्तीची कारवाई झाली पाठोपाठ चीन सरकारनेही पाकिस्तानच्या नागरिकांना आणि विमानांना प्रवेशबंदी केली आहे.

चीनमध्ये दाखल झालेल्या दहा पाकिस्तानी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिनपिंग प्रशासनाने कठोर निर्णय घेतला. चीनमध्ये तीन आठवड्यांसाठी पाकिस्तानच्या नागरिकांना आणि पाकिस्तान सरकारच्या विमान कंपनीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स कंपनीची चीनला जाणारी पुढील तीन आठवड्यांची सर्व उड्डाणे रद्द झाली आहेत. 

मागील काही दिवसांत पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा दीर्घ काळासाठी खंडीत होण्याचे प्रकार वाढले आहे. पाकिस्तानमधील कराची शहरातही वारंवार वीजेअभावी अंधार पडत आहे. कराचीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी ओळखले जाते. याच शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होऊ लागल्यामुळे पाकिस्तानचे अर्थकारण कोलमडू लागले आहे. 

देशाच्या सध्याच्या जीडीपीच्या १०७ टक्के इतके प्रचंड कर्ज पाकिस्तानवर आहे. मित्र देश आणि आंतरराष्ट्रीय वित्त संस्था यांचे ११२.८ अब्ज अमेरिकन डॉलर एवढे मोठे कर्ज पाकिस्तानवर आहे. कर्जाच्या या विळख्यातून बाहेर पडणे पाकिस्तानसाठी अतिशय कठीण झाले आहे. या बिकट परिस्थितीत मित्रांकडूनच पाकिस्तानवर निर्बंध लादले जाण्यास सुरुवात झाल्यामुळे पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी