Signals from Alien civilizations : नवी दिल्ली : परग्रहवासियांबद्दल, परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल (alien civilizations)मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. आता विज्ञानाच्या साहाय्याने त्याचा पद्धतशीरपणे शोध घेतला जातो आहे. विविध देशांच्या अंतराळ संशोधन संस्था यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. जगभरातील अनेक रेडिओ दुर्बिणी (Radio Telescope) यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसल्या आहेत. मात्र आता चीनने (China) दावा केला आहे की त्यांना बहुधा परग्रहवासियांचे सिग्नल सापडले आहेत. चीन सरकार पुरस्कृत सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेलीच्या वृत्तानुसार, चीनने म्हटले आहे की त्यांच्या विशाल स्काय आय ( Sky Eye) या दुर्बिणीने कदाचित परग्रहवासियांचे सिग्नल पकडले आहेत किंवा त्यांना असे सिग्नल सापडले आहेत. आधी चीनने यासंदर्भातील बातमी प्रकाशित केली आणि नंतर मात्र या शोधाबद्दलचा अहवाल आणि पोस्ट हटवल्यासारखे दिसून आले. (China first claim signals from aliens & then the report deleted)
अधिक वाचा : Blanket on Mars : मंगळ ग्रहावर NASA च्या रोव्हरनं टिपला रहस्यमय फोटो, लक्ष देऊन पाहिल्यावर समजतं सत्य
स्काय आय - जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिणीने शोधलेले अरुंद-बँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल - पूर्वी सापडलेल्या सिग्नलपेक्षा वेगळे आहेत आणि टीम त्यांची अधिक चौकशी करत आहे, असे चीनमधील वृत्तात म्हटले आहे. चायनीज एकेडमी ऑफ सायन्सेसची राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्यासह बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीने सह-स्थापना केलेल्या एक्स्ट्राटेस्ट्रियल सिव्हिलायझेशन सर्च टीमचे मुख्य शास्त्रज्ञ झांग टोन्जी यांचा हवाला देऊन हे वृत्त देण्यात आले आहे.
चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकृत वृत्तपत्र असलेल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेलीच्या वेबसाइटवरून हे वृत्त का काढले गेले हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. परंतु सोशल नेटवर्कवर ही बातमी आधीच ट्रेंडिंग सुरू झाली होती आणि इतर माध्यमांनी ती उचलली होती. यात चीन सरकारच्या प्रसार माध्यमांचाही समावेश होता.
अधिक वाचा : पावागडच्या मंदिरात पीएम मोदींच्या उपस्थितीत पूजा, शेकडो वर्षांनी बांधला कळस केले ध्वजारोहण
चीनच्या नैऋत्य गिझाऊ ( Guizhou) प्रांतात जगातील अवाढव्य रेडिओ दुर्बीण जिचे नाव स्काय आय आहे ती आहे. या दुर्बिणीचा व्यास 500 मीटर (1,640 फूट) इतका विशाल आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, स्काय आय दुर्बिणेने अधिकृतपणे बाह्य जीवनाचा शोध सुरू केला. 2019 मध्ये गोळा केलेल्या माहितीवर प्रक्रिया करताना टीमला 2020 मध्ये संशयास्पद सिग्नलचे दोन सेट सापडले आणि एक्सोप्लॅनेट लक्ष्यांच्या निरीक्षण डेटावरून 2022 मध्ये आणखी एक संशयास्पद सिग्नल सापडला, असे झांग म्हणाले.
कमी-फ्रिक्वेंसी रेडिओ बँडमध्ये चीनचा स्काय आय अत्यंत संवेदनशील आहे आणि परग्रहवासियांच्या शोधात तो महत्त्वाची भूमिका बजावतो, असे झांग यांनी सांगितले आहे. मात्र संशयास्पद सिग्नल एखाद्या प्रकारचा रेडिओ लहरींमधील अडथळादेखील असू शकतात आणि यासाठी पुढील तपास, संशोधनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.