चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा; राजकीय घडामोडींना वेग

China's Defence Minister in Nepal चीनचे संरक्षणमंत्री वी फेंगहे यांनी एक दिवसाचा नेपाळ दौरा केला. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यानंतर हा दौरा झाला.

China's Defence Minister in Nepal
चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा; राजकीय घडामोडींना वेग
  • भारताचे लष्करप्रमुख नरवणे नेपाळचे मानद जनरल
  • 'रॉ' प्रमुखांचा नेपाळ दौरा

काठमांडू: भारताच्या लष्करप्रमुखांना नेपाळने मानाचे पद देऊन त्यांचा सत्कार केला. यानंतर काही दिवसांच्या आत चीनचे संरक्षणमंत्री वी फेंगहे (Wei Fenghe) नेपाळच्या दौऱ्यावर आले. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यानंतर नेपाळचे संरक्षणमंत्री चीनच्या दौऱ्यावर आले. या वर्षीचा चीनचा नेपाळमधील हा उच्च पातळीवरचा दौरा आहे. मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीनचे प्रतिनिधी सातत्याने नेपाळच्या संपर्कात आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचे दोन देश नेपाळसोबतचा संपर्क राखण्यावर भर देत आहेत. बंद दाराआड होत असलेल्या चर्चांमुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. (China's Defence Minister in Nepal)

काठमांडू विमानतळावर नेपाळचे गृहमंत्री राम बहादूर थापा यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी तसेच पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री खड्गप्रसाद शर्मा ओली (Nepal Prime Minister KP Sharma Oli / केपी शर्मा ओली) यांची काठमांडूत भेट घेतली. चीनच्या संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने नेपाळचे लष्करप्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाशी लष्करी सहकार्य या विषयावर चर्चा केली. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन दिवसांचा नेपाळ दौरा केला होता. 

भारताचे लष्करप्रमुख नरवणे नेपाळचे मानद जनरल

काठमांडूत ५ नोव्हेंबर रोजी शीतलनिवास येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा मानद जनरल या उपाधीने गौरव केला. याप्रसंगी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, भारताचे नेपाळमधील राजदूत विनय एम. क्वात्रा, भारत आणि नेपाळचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोहळ्यानंतर लष्करप्रमुख नरवणेंनी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याशी चर्चा केली. भारत आणि नेपाळ सहकार्य अधिकाधिक वाढावे अशा शब्दात आपल्या भावना नरवणेंनी व्यक्त केल्या. नरवणेंनी नंतर पंतप्रधान ओली तसेच नेपाळच्या लष्करप्रमुखांची भेट घेतली होती. 

'रॉ' प्रमुखांचा नेपाळ दौरा

लष्करप्रमुख नरवणे यांच्या नेपाळ दौऱ्याआधी भारतात २६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत भूदलाच्या कमांडरची बैठक पार पडली. या बैठकीआधी भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'चे (Research & Analysis Wing - RAW) प्रमुख सामंत कुमार गोयल (Samant Kumar Goel) नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. नेपाळ दौऱ्यात त्यांनी नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली (Nepal Prime Minister KP Sharma Oli / केपी शर्मा ओली) यांची काठमांडू येथे भेट घेतली होती. दोघांमध्ये एकांतात दीर्घकाळ चर्चा झाली होती.

चीनची धडपड

जग कोरोना संकटाशी लढत असताना लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी स्वतःचा भूभाग असल्याचा दावा नेपाळने केला होता. या दाव्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र 'रॉ' प्रमुखांच्या नेपाळ दौऱ्यानंतर हा मुद्दा मागे पडला. याआधी तणाव असताना नेपाळ कोणाच्या तरी इशाऱ्यावरुन दावा करत आहे, असे लष्करप्रमुख नरवणे म्हणाले होते. भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक मैत्री सुरळीत होत असताना चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी काठमांडू गाठल्यामुळे चीनची नेमकी कोणत्या कारणाने धडपड सुरू आहे यावरुन तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भारताचे भूभाग

लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी हे भारताचे भूभाग आहेत. नैसर्गिक उंचीमुळे या भूभागांमधून भारताच्या सीमेचे रक्षण करतानाच नेपाळ आणि चीनच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे आहे. स्वातंत्र्याआधी ब्रिटीश इंडियाची रॉयल आर्मी या भूभागांचे रक्षण करत होती. भारत स्वतंत्र झाल्यापासून या भूभागांचे संरक्षण भारताचे सैन्य करत आहेत. भारत-चीन दरम्यान १९६२ मध्ये युद्ध झाल्यानंतर या परिसराच्या रक्षणाची जबाबदारी भारत-तिबेट सीमा पोलिसांकडे देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी