चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा ठरला 'फ्लॉप शो'

चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा हा एक 'फ्लॉप शो' झाला. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यानंतर हा दौरा झाला.

Chinese defence minister 'snubbed' by Nepal and Bangladesh
चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा ठरला 'फ्लॉप शो' 

थोडं पण कामाचं

  • चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा ठरला 'फ्लॉप शो'
  • नेपाळच्या अनेक नेत्यांना भेटण्याचा चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा प्रयत्न अयशस्वी
  • चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा बांगलादेश दौरा रद्द

काठमांडू: चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा हा एक 'फ्लॉप शो' झाला. चीनचे संरक्षणमंत्री वी फेंगहे (Chinese Defence minister Wei Fenghe) यांनी एक दिवसाचा नेपाळ दौरा केला. भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्या दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यानंतर हा दौरा झाला. अवघ्या दहा तासांच्या या दौऱ्यात चीनचे संरक्षणमंत्री नेपाळच्या किमान डझनभर नेत्यांना भेटण्यास इच्छुक होते. प्रत्यक्षात नेपाळ सरकारने फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्करप्रमुख यांनाच भेटणे शक्य असल्याचे चीनला कळवले. यामुळे नेपाळवर दबाव टाकण्याचा चिनी प्रयत्न अयशस्वी झाल्याची चर्चा आहे. (Chinese defence minister 'snubbed' by Nepal and Bangladesh)

काठमांडू विमानतळावर नेपाळचे गृहमंत्री राम बहादूर थापा यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांचे स्वागत केले. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी तसेच पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री खड्गप्रसाद शर्मा ओली (Nepal Prime Minister KP Sharma Oli / केपी शर्मा ओली) यांची काठमांडूत भेट घेतली. चीनच्या संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका शिष्टमंडळाने नेपाळचे लष्करप्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाशी लष्करी सहकार्य या विषयावर चर्चा केली. मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन दिवसांचा नेपाळ दौरा केला होता. 

नेपाळच्या अनेक नेत्यांना भेटण्याचा चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा प्रयत्न अयशस्वी

नेपाळच्या अनेक नेत्यांना भेटण्याचा चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. नेपाळ सरकारने फक्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्करप्रमुख यांनाच भेटणे शक्य असल्याचे चीनला कळवले. चीनच्या संरक्षणमंत्र्यांच्या आधी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान एका मागून एक या पद्धतीने भारताच्या प्रतिनिधींनी सातत्याने नेपाळ दौरे केले. या दौऱ्यांमुळे चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा नेपाळ दौरा एक 'फ्लॉप शो' झाला. नेपाळमधील 'फ्लॉप शो' नंतर चीनच्या संरक्षणमंत्र्यांचा बांगलादेश दौरा रद्द झाला. अखेर पाकिस्तानचा दौरा करुन चीनचे संरक्षणमंत्री परत गेले.

भारतासाठी नेपाळ आणि नेपाळसाठी भारत महत्त्वाचा

भारतीय प्रतिनिधींच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान झालेल्या दौऱ्यांनी भारतासाठी नेपाळ आणि नेपाळसाठी भारत महत्त्वाचा असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत केले. सर्वात आधी ऑक्टोबर महिन्यात भारतीय गुप्तचर संस्था 'रॉ'चे (Research & Analysis Wing - RAW) प्रमुख सामंत कुमार गोयल (Samant Kumar Goel) नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. नेपाळ दौऱ्यात त्यांनी नेपाळचे पंतप्रधान खड्गप्रसाद शर्मा ओली (Nepal Prime Minister KP Sharma Oli / केपी शर्मा ओली) यांची काठमांडू येथे भेट घेतली होती. दोघांमध्ये एकांतात दीर्घकाळ चर्चा झाली होती.

'रॉ' प्रमुखांच्या भेटीनंतर भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे चीन दौऱ्यावर गेले होते. काठमांडूत ५ नोव्हेंबर रोजी शीतलनिवास येथे झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांचा मानद जनरल या उपाधीने गौरव केला. याप्रसंगी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, भारताचे नेपाळमधील राजदूत विनय एम. क्वात्रा, भारत आणि नेपाळचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोहळ्यानंतर लष्करप्रमुख नरवणेंनी राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांच्याशी चर्चा केली. भारत आणि नेपाळ सहकार्य अधिकाधिक वाढावे अशा शब्दात आपल्या भावना नरवणेंनी व्यक्त केल्या. नरवणेंनी नंतर पंतप्रधान ओली तसेच नेपाळच्या लष्करप्रमुखांची भेट घेतली होती. या नंतर भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दोन दिवसांचा नेपाळ दौरा केला. भारतीय प्रतिनिधींचे नेपाळ दौरे यशस्वी झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी