Chinese Nuclear Programme | चीन वेगाने वाढवतोय आपल्या अण्वस्त्रांचा साठा, २०३०पर्यत बनवणार १,००० अणुबॉम्ब

Chinese Nuclear Programme | विविध कारणांमुळे विशेषत: तैवानच्या प्रश्नामुळे अमेरिका आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात. या अहवालानुसार भविष्यात अमेरिकेशी दोन हात करण्याची आणि अमेरिकेला युद्धात हरवण्याची तयारी चीन करतो आहे.

China Nuclear bombs
चीनचा वाढता अण्वस्त्रसाठा 
थोडं पण कामाचं
  • अमेरिकन संरक्षण खात्याचा अंदाज होता त्यापेक्षा अधिक वेगाने चीन अण्वस्त्रे तयार करतो आहे
  • २०३० पर्यत चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवून १,००० पर्यत नेऊ शकतो
  • अमेरिकेकडे सध्या ३,७५० अण्वस्त्रे

China | वॉशिंग्टन : चीन आपल्या अण्वस्त्रांचा साठा (Nuclear waepons)जबरदस्त वेगाने वाढवतो आहे. एक वर्षापूर्वी अमेरिकन संरक्षण खात्याचा (US defence department) अंदाज होता त्यापेक्षा अधिक वेगाने चीन (China)अण्वस्त्रे तयार करतो आहे. जाणकारांच्या मते अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या क्षमतेइतकीच क्षमता मिळवण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. लवकरात लवकर अमेरिकेपेक्षा अधिक सामर्थ्यवान होण्यासाठीच्या योजना चीनने आखल्या आहेत. चीनच्या या जबरदस्त मुसंडीमुळे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेले पेंटागॉनदेखील (Pentagon) चिंताग्रस्त झाले आहे. (Pentagon Says China's Nuclear weapons are growing faster than expected)

२०३० पर्यत १,००० अण्वस्त्रे बनवणार चीन

अमेरिकन संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटागॉनच्या अहवालानुसार चीन सहा वर्षात ७०० अण्वस्त्रे तयार करण्याच्या योजनेवर काम करतो आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार २०३० पर्यत चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवून १,००० पर्यत नेऊ शकतो. एक वर्षाआधीच पेंटागॉनने चीनच्या अण्वस्त्रांची संख्या २०० असल्याचे सांगितले होते. ही संख्या दुप्पट होण्यास काही वर्षे लागतील असा अमेरिकेचा अंदाज होता, मात्र चीनने अमेरिकेला चकवा दिला आहे. 

३० वर्षात चीनची ताकद अमेरिकेएवढी

अमेरिकेकडे सध्या ३,७५० अण्वस्त्रे आहेत. जगातील कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक अण्वस्त्रांचा साठा अमेरिकेकडे आहे. मात्र सध्यातरी यात वाढ करण्याचा अमेरिकेचा इरादा नाही. २००३ मध्ये अमेरिकेकडे तब्बल १०,००० अण्वस्त्रे होती. त्यानंतर विविध करार आणि शांततेसाठी प्रयत्न यामुळे अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या संख्येत घट झाली. आता चीनने मारलेल्या मुसंडीमुळे आणि भविष्यातील चीनच्या योजना लक्षात घेऊन अमेरिकन सरकारला हा निर्णय घ्यावा लागणार आहे की त्यांना आणखी अण्वस्त्रे वाढवायची आहेत की नाहीत. 

अमेरिकेला युद्धात हरवण्यासाठी चीनची तयारी

अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. अमेरिकेला लष्करी पातळीवर शह देण्यासाठी चीन आपली संरक्षण सिद्धता आणि लष्करी ताकद वाढवतो आहे. सध्यातरी पेंटागॉनचा अमेरिकन सरकारला लढवण्याचा सल्ला नाही. मात्र पेंटागॉन अमेरिकन सरकारला युद्धाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे राहण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला नक्कीच देते. कारण विविध कारणांमुळे विशेषत: तैवानच्या प्रश्नामुळे अमेरिका आणि चीन एकमेकांसमोर उभे ठाकू शकतात. या अहवालानुसार भविष्यात अमेरिकेशी दोन हात करण्याची आणि अमेरिकेला युद्धात हरवण्याची तयारी चीन करतो आहे. कारण चीनचा एकमेव आणि सर्वात मोठा प्रतिस्पर्धी देश अमेरिका हाच आहे. अमेरिकेला नमवूनच चीन सुपरपॉवर बनू शकतो. त्यामुळे आगामी काळात चीनला डोळ्यासमोर ठेवूनच अमेरिकेला आपणे धोरण आखावे लागणार आहे. चीन सहा वर्षात ७०० अण्वस्त्रे तयार करण्याच्या योजनेवर काम करतो आहे. पेंटागॉनच्या अहवालानुसार २०३० पर्यत चीन आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवून १,००० पर्यत नेऊ शकतो. त्यामुळे अण्वस्त्रे स्पर्धेला पुन्हा एकदा वेग येऊ शकतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशिया यांच्यात अण्वस्त्र साठा वाढवण्यासाठी अशीच स्पर्धा झाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी