Climate Change | जगासमोर नवे आव्हान, CO2 उत्सर्जन कोरोनापूर्वीच्या पातळीवर

Climate Change | कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन आणि इतर निर्बंधे घालण्यात आली होती. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये काबर्न डायऑक्साईडच्या उत्सर्जनात मोठी घट झाली होती. मात्र आता पुन्हा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे.

Climate Change & CO2 Emission
कार्बन उत्सर्जन आणि हवामान बदल 
थोडं पण कामाचं
  • ग्लोबल वार्मिंगचे संकट जगासमोर आ वासून उभे
  • भारताने २०७० पर्यत नेट झीरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे
  • जगातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन पुन्हा एकदा कोरोना महामारीपूर्वीच्याच पातळीवर पोचते आहे

CO2 Emission | नवी दिल्ली : जगात सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. मात्र याहूनही मोठे असे हवामान बदलाचे किंवा ग्लोबल वार्मिंगचे संकट जगासमोर आ वासून उभे आहे. सर्व देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना यासंदर्भात प्रयत्न करत आहेत. क्लायमेट चेंज किंवा हवामान बदलासंदर्भात पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की भारताने २०७० पर्यत नेट झीरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. जगातील सर्वात मोठी ऊर्जा संघटन असलेल्या इंटरनॅशनल एनर्जी फोरमने या निर्णयाचे कौतुक केले आहे. एका अहवालानुसार जागतिक कार्बन उत्सर्जन कोरोना महामारीच्या पूर्वी असलेल्या पातळीवर पोचते आहे. (Climate Change | New challenge in front of world, Carbon emission to reach before corona pandemic level)

कोरोना महामारीच्या काळात कार्बन उत्सर्जन घटले

कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन आणि इतर निर्बंधे घालण्यात आली होती. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये काबर्न डायऑक्साईडच्या उत्सर्जनात मोठी घट झाली होती. मात्र आता पुन्हा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. यावर्षी जगातील कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन पुन्हा एकदा कोरोना महामारीपूर्वीच्याच पातळीवर पोचते आहे. जगभरातील राष्ट्रप्रमुख सीओपी२६ परिषदेत ग्लासगो येथे भेटत असताना हा अहवाल समोर आला आहे. ग्लासगो येथील परिषदेचे उद्दिष्ट ग्लोबल वार्मिंगच्या धोक्याला तोंड देण्यासंदर्भात धोरणे आखून त्यावर अंमलबजावणी करणे हे आहे. समोर आलेल्या अहवालाचे विश्लेषण ग्लोबल कार्बन प्रोजेक्टद्वारे करण्यात आले आहे. हा गट वैज्ञानिकांचा गट असून तो जागतिक ग्रीनहाऊस वायूंसंदर्भातील माहिती गोळा करतो.

जागतिक कार्बन उत्सर्जन स्तर

जीवाश्म इंधनापासून तयार होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण २०२० मध्ये त्याआधीच्या तुलनेत ५.४ टक्के कमी झाले होते. मात्र यावर्षी २०२०च्या पातळीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनात ४.९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण जागतिक बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होऊ लागल्याने इंधनाची झालेली वाढ हे आहे. 

सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणारे देश

चीनमधील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढले आहे. भारतात यावर्षी चीनपेक्षा अधिक वेगाने कार्बन उत्सर्जन होण्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि युरोपातील देशांमध्ये देखील यावर्षी कार्बन उत्सर्जन ७.६ टक्के वाढण्याची चिन्हे आहेत.

२०३० पर्यत आवश्यकतेच्या ५० टक्के अपारंपारिक ऊर्जा

इंटरनॅशनल एनर्जी फोरमने गुरुवारी भारताच्या २०७०पर्यत झीरो कार्बन एमिशनचे उद्दिष्ट गाठण्याच्या धोरणाचे कौतुक केले. या संघटनेचे ७१ सदस्य आहेत. यामध्ये भारतदेखील सभासद आहे. भारताने या परिषदेत म्हटले की भारत २०३० पर्यत अपारंपारिक ऊर्जेद्वारे ५०० गीगा वॅट ऊर्जा निर्मिती करेल. २०३०पर्यत भारत आपल्या गरजेच्या  ५० टक्के इतकी ऊर्जा अपारंपारिक ऊर्जा प्रकारातून उपलब्ध करेल. २०३० पर्यत भारत कार्बन उत्सर्जनात एक अब्ज टनाची कपात करणार आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी