प. बंगालमध्ये टीएमसीची हॅटट्रिक पण ममतांचा पराभव

प.बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २००पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता राखली. पण TMCच्या अध्यक्षा आणि प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला.

CM Mamata Banerjee reaction on West Bengal assembly election massive win
प. बंगालमध्ये टीएमसीची हॅटट्रिक पण ममतांचा पराभव 

थोडं पण कामाचं

  • प. बंगालमध्ये टीएमसीची हॅटट्रिक पण ममतांचा पराभव
  • पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २००पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली
  • भाजपने ७०पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २००पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता राखली. पण तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. CM Mamata Banerjee reaction on West Bengal assembly election massive win

नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला आणि शुभेंदू अधिकारी जिंकले. शुभेंदू अधिकारी १६२२ मतांनी विजयी झाले. ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारल्याचे जाहीर करताना निकालाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याची घोषणा केली. मतमोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. 

ममता बॅनर्जी यांचा पराभव झाल्यामुळे त्यांना पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, असे भाजपचे अमित मालवीय म्हणाले. या वक्तव्यावर ममतांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

डाव्यांना हरवून तृणमूल काँग्रेसने २०११ मध्ये पहिल्यांदा पश्चिम बंगालची सत्ता काबीज केली. यानंतर २०१६ आणि आता २०२१ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमताच्या जोरावर तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालची सत्ता राखली. 

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपची कामगिरी. भाजपला २०१४च्या विधानसभा निवडणुकीत तीन जागांवर विजय मिळवता आला होता. पण २०२१च्या निवडणुकीत भाजपने ७०पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जाहीर होतील. पण आघाड्यांची स्थिती पाहता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ताधारी आणि भाजप मुख्य विरोधी पक्ष हे चित्र दिसू लागले आहे.

पश्चिम बंगालच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. जनतेच्या पाठिंब्या तृणमूल काँग्रेसचा निवडणुकीत विजय झाल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. भाजपने हीन पातळीचे राजकारण केले पण त्यांचा पराभव झाला, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. 

भाजपच्या नेत्यांनी विजयासाठी ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे अभिनंदन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपचे पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्याकडून पक्षाच्या कामगिरीचा थोडक्यात आढावा घेतला. कैलाश विजयवर्गीय लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीचा सविस्तर आढावा सादर करणार असल्याचे वृत्त आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी