Weather Update In India : देशातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असल्याचे चित्र असून काही भागात थंडी आणि धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली, युपी, हिमाचल प्रदेश, काश्मीरसह अनेक राज्यांमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. थंडीमुळे पडत असलेल्या या धुक्यामुळे उत्तर भारतातील रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. देशात थंडीने कहर केला आहे. अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे. महाराष्ट्रातील विदर्भात तापमान कमी होण्याचा 9 वर्षाचा रिकॉर्ड मोडला आहे. तर उत्तरेत थंडीमुळे कानपूरमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. (Cold ravages the country; Record breaking temperature in Vidarbha, impact on traffic )
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये रात्री आणि सकाळी थंडी आणि दाट धुके पडत आहे. थंडीच्या लाटेचा मानवी जीवनावर परिणाम होत असल्याचं दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा जोर इतका वाढला आहे की, थंडीमुळं हृदयविकाराच्या धक्क्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे.
तीन-चार दिवसांपासून गोंदिया जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत असल्याने गोंदिया जिल्हा गारठल्याचे चित्र आहे. काल जिल्ह्यात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे या मोसमातील सर्वात कमी तापमान होते. या कमी तापमानाने मागील 9 वर्षांतील तापमानाचा रेकॉर्ड मोडला आहे. दरम्यान विदर्भात थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबईमध्येही थंडीचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे.
हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताची स्थिती तीव्र झाली आहे.यामुळे उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीचा कडाका आणि दाट धुके वाढले आहे. मात्र, या भागाकडून राज्यांकडे येणार्या थंड वार्यांमध्ये बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता तामिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळेच विदर्भात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. अजून दोन दिवस या भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
थंडीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरील विमानसेवा प्रभावित झाली आहे. दाट धुक्यामुळे विमानांची अनेक उड्डाणे आधीच उशिराने धावत आहेत. रविवारी सुमारे 20 विमानांची उड्डाणे उशिराने झाली. रविवारी सकाळी दिल्लीला जाणाऱ्या 42 गाड्या उशिराने धावत होत्या. उत्तर रेल्वेने आज आपल्या अपडेटमध्ये खराब दृश्यमानतेमुळे किमान 2-3 तास उशिराने धावणाऱ्या गाड्यांची यादी शेअर केली आहे.