अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पाहा कॉलेजवयीन तरुणीने काय केलं! 

College Girl Commits Suicide: तरुणीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. 

college girl commits suicide after young accused threats to viral her obscene video 
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, पाहा तरुणीने काय केलं! (प्रातिनिधिक फोटो)   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • तरुणीवर बलात्कार करुन अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी 
  • आरोपी तरुणीला सतत त्रास देत असल्याचा मृत तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप 
  • आरोपीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपवलं आयुष्य

नवी दिल्ली: आपल्या उज्ज्वल भविष्याचचं स्वप्न पाहणारी आणि एका हाय प्रोफाइल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीचं संपूर्ण आयुष्य छेडछाड, बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ यामुळे बरबाद झालं. जेव्हा या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेनासा झाला तेव्हा तरुणीने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकारामुळे तरुणीच्या कुटुंबीयांना मात्र खूपच धक्का बसला आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील तिलक नगरमध्ये घडली. मृत तरुणी ही एका चांगल्या कॉलेजमध्ये इंग्रजी आणि जर्मन भाषेचा अभ्यास करत होती. 

तरुणीची आई ही गुरुवारी संध्याकाळी डॉक्टरकडे गेली होती. त्यावेळी तरुणी घरी एकटीच होती. त्यामुळे रस्त्यात असतानाच आईने तरुणीला फोन केला. पण बराच वेळ झाला तरी तरुणी फोन उचलत नव्हती. जेव्हा तरुणीची आई घरी परतली त्यावेळी ही धक्कादायक घटना समोर आली. 

पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत तरुणीच्या आईने आणि तिच्या मैत्रिणीने करण नावाच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. तरुणीच्या आईने याबाबत असं म्हटलं आहे की, 'याच तरुणाने माझ्या मुलीसोबत छेडछाड आणि बलात्कार देखील केला. त्यानंतर त्याने तिचे फोटो आणि अश्लील व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली.' असा आरोप तरुणीच्या आईने केला आहे. 

मृत तरुणीच्या आईने याबाबत सांगताना असं म्हटलं की, 'एकदा या तरुणाने माझ्या मुलीसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिने मुलाच्या वडिलांकडे याविषयी तक्रार देखील केली होती. त्यावेळी त्याच्या वडिलांनी या मुलाला योग्य ती समजही दिली होती. पण तरीही तो सतत माझ्या मुलीला त्रास देतच राहिला. पण तरुणीने याबाबत आपल्या घरी काहीही सांगितलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी तिने आपल्या मैत्रिणीला सांगितल्या होत्या. ज्या तिच्या आत्महत्येनंतर मैत्रिणीने कुटुंबीयांना सांगितल्या. या मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की, 'ती या सगळ्या गोष्टी तिच्या कुटुंबीयांना सांगणार होती. पण त्याआधीच तिने आत्महत्या केली.' 

याबाबत दिल्ली पोलिसांनी कलम ३०६ अंतर्गत आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सध्या पोलीस अतिशय गंभीरपणे चौकशी करत आहेत. तसंच पोस्टमार्टम अहवालाची पोलीस वाट पाहत आहेत. त्यानंतरच पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी