Kerala Undergarment Row: : तिरुवनंतपुरम : केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नीट परीक्षेसाठी आलेल्या काही विद्यार्थिनींचे अंतरवस्त्र उतरवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आरोप खोटा असून चुकीच्या हेतूने तक्रार दाखल करण्यात आल्याचे नॅशन टेस्टिंग एजन्सीने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केरळच्या कोल्लम जिल्ह्यात नीट परीक्षा केंद्रात एक १७ वर्षीय विद्यार्थिनी परीक्षेसाठी गेली होती. तेव्हा तिला अंतरवस्त्र काढून ठेवून परीक्षा देण्यास सांगितले. याबाबत पीडित विद्यार्थिनीच्या माध्यमांना माहिती दिली आहे. विद्यार्थिनीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आता ते मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार दाखल करण्यात आहेत. आपल्या मुलीने परीक्षेच्या ड्रेसकोडनुसारच कपडे परिधान केले होते असेही पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एनटीएच्या अधिकार्याने अशी कुठलीही तक्रार मिळाली नसल्याचे सांगितले आहे. माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर परीक्षा पर्यवेक्षक आणि सुपरिटेंडेंट यांच्याकडून चौकशी अहवाल मागवण्यात आल आहे. अशा प्रकारची कुठलीच घटना घडलेली नाही तसेच विद्यार्थिनींचे अंतरवस्त्र काढण्याची घटना काल्पनिक असून वाईट हेतूने तक्रार दाखल करण्यात आली आहे असेही एनटीएच्या अधिकार्याने म्हटले आहे.
पीडित मुलीने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तिने सांगितले की आम्ही परीक्षेसाठी केंद्रात दाखल झालो. तेव्हा तिथे आमची स्कॅनिंग करून तपासणी करण्यात आली. याबाबत आम्हाला आधी काहीच माहित नव्हते. नंतर एका अधिकार्याने आम्हाला एका रांगेत उभे राहण्यास सांगितले. तेव्हा मला विचारण्यात आले की माझ्या अंडरगारमेंट्सला कुठला हूक लागला आहे का? तेव्ही त्यांना हो असे सांगितले. नंतर मला बाजूला उभे राहण्यास सांगितले. तेव्हा एका खोलीत काही मुली उभ्या होत्या. अधिकार्यांना विचारणा केल्यास त्यांनी आम्हाला इथेच अंतरवस्त्र काढून ठेवण्यास सांगितले. आम्ही त्या खोलीत गेलो तेव्हा जमिनीवर मुलींची अनेक अंतरवस्त्रे पडली होती. या खोलीत आम्ही आमची अंतरवस्त्रे काढून ठेवली आणि परीक्षेसाठी वर्गात गेलो. पण परतताना ही अंतरवस्त्रे आम्हाला मिळतील का याबाबत आम्हाला चिंता होती. त्या खोलीत एक मुलगी रडत होती. सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे जाताना आम्हाला आमची अंतरवस्त्रे हातात घेऊन जावी लागली. या परीक्षेला अनेक मुलेही उपस्थित होती, त्यांच्या समोर आम्हाला अशा प्रकारे वागणूक दिल्याने आम्हाला खूप मानसिक त्रास झाला असेही या पीडित मुलीने सांगितले.