Sonia Gandhi Hospitalized | काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यावर उपचार सुरू असताना अचानक त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी दिली आहे. ट्विट करून त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे.
सोनिया गांधींवर उपचार सुरू
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीतील गंगा राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोव्हिड संबंधित त्रास बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील काही दिवस ‘अंडर ऑब्झर्वेशन’ ठेवलं जाणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तांनी दिली आहे.
Congress interim president Sonia Gandhi admitted to Ganga Ram Hospital today owing to Covid-related issues. She is stable and will be kept at the hospital for observation, says Congress leader Randeep Singh Surjewala pic.twitter.com/AkDP5ncMg8 — ANI (@ANI) June 12, 2022
दहा दिवसांनंतरही त्रास सुरूच
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांची कन्या प्रियंका गांधी या दोघींनाही 2 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. प्रियंका गांधींनी ट्विटरवरून ही माहिती जाहीर करत आपल्या संपर्कात आलेल्या सर्वानी काळजी घेण्याचं आणि तपासणी करून घेण्याचं आवाहनही केलं होतं. सोनिया गांधी यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र आता अचानक त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल कऱण्यात आल्याची बातमी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी दिल्यामुळे कार्यकर्ते काहीसे चिंतित झाले आहेत. कोरोना साधारणतः पहिल्या आठवड्यात जोर धरतो आणि दुसऱ्या आठवड्यापासून त्याचा त्रास कमी होऊ लागतो, असा अनुभव आहे. सोनिया गांधी यांना कोरोना झाल्याला आता दहा दिवस उलटून गेले असताना त्यांना कोरोनाशी संबंधित त्रास होऊ लागला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून काळजी करण्याचं कारण नाही, अशी माहिती काँग्रेसने दिली आहे. लवकरच त्यांच्या तब्येतीबाबतचे अधिक तपशील जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी
नॅशनल हेराल्ड प्रकरणाची बंद झालेली फाईल ईडीनं पुन्हा बजावली असून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. सोनिया गांधींना त्याच दरम्यान कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जाण्यासाठी वेळ मागून घेतला आहे. कोरोनातून पूर्ण बऱ्या झाल्यानंतर सोनिया गांधींची चौकशी होणार आहे, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 13 जून रोजी म्हणजेच सोमवारी चौकशी होणार आहे. यावेळी काँग्रेसने शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली असून भाजपवर आरोप केले आहेत. राजकीय कुरघोडी करण्यासाठी मोदी सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.