काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन 

Rajiv Tyagi: काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं निधन झालं आहे. राजीव त्यागी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गाझियाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचं निधन झालं आहे. 

Rajiv Tyagi
काँग्रेस नेते राजीव त्यागी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • बुधवारी सायंकाळी एका न्यूज चॅनलच्या डिबेट शोमध्ये सहभागी झाले होते राजीव त्यागी
  • सायंकाळी प्रकृती अचानक बिघडल्याने रुग्णालयात केलं दाखल

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress Party) प्रवक्ते राजीव त्यागी (Rajiv Tyagi) यांचे निधन झाले आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. विनीत पूनिया यांनी त्यांच्या निधनाबाबतची माहिती दिली आहे. भाजपचे प्रवक्त संबित पात्रा यांनीही राजीव त्यागी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 

सायंकाळी केलं होतं शेवटचं ट्वीट 

काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांनी बुधवारी संध्याकाळच्या सुमारास आपल्या ट्वीटर हँडलवरुन एक ट्वीट केलं होतं आणि हेच ट्वीट त्यांचं शेवटचं ट्वीट ठरलं आहे. 

उघडपणे आपलं मतं मांडणे आणि आक्रमकपणे भाष्य करण्यासाठी राजीव त्यागी हे टीव्ही जगतात ओळखले जात होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्यासोबत टीव्ही चॅनलच्या चर्चेत राजीव त्यागी यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं पहायला मिळत असे. आपले मुद्दे पुराव्याशी मांडणे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने मांडण्यासाठी राजीव त्यागी प्रसिद्द होते.

काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राजीव त्यागी यांच्या निधनाची माहिती देत शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसने म्हटलं, राजीव त्यागी यांच्या आकस्मित निधनाने आम्ही सर्वजण दु:खी आहोत. ते एक कट्टर काँग्रेस नेते आणि खरे देशभक्त होते.

प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय होते त्यागी 

गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव त्यागी यांची उत्तरप्रदेशचे मीडिया प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. राजीव त्यागी हे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते होते आणि त्यांनी काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांवर काम केले आहे.

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव त्यागी यांना पक्षाचे समर्पित योद्धा म्हटले आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचे अकाली निधन माझ्यासाठी दु:खद घटना आहे. आपल्या सर्वांचे नुकसान झाले आहे. राजीवजी हे एक समर्पित योद्धा होते. संपूर्ण उत्तरप्रदेश काँग्रेसच्या वतीने शोक व्यक्त करते. निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना देवो, ही परमेश्वराकडे प्रार्थना.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी