Rahul Gandhi @ ED : राहुल गांधींची ईडी चौकशी, काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन, अनेक दिग्गज नेते पोलिसांच्या ताब्यात

नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या चौकसीसाठी राहुल गांधी ईडी कार्यालयात जात असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'सत्याग्रह मार्च' काढत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं.

Rahul Gandhi @ ED
दिल्लीत अनेक काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • राहुल गांधी चौकशीसाठी ईडी कार्यालयात
  • आंदोलन करणारे काँग्रेस नेते पोलिसांच्या ताब्यात
  • काँग्रेसचा शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न

Rahul Gandhi @ ED | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकऱणी समन्स बजावण्यात आल्यानंतर ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. मात्र त्यापूर्वी काँग्रेसनं दिल्लीत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्यामुळेच नॅशनल हेराल्ड प्रकरणाची बंद झालेली फाईल पुन्हा उघडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसनं मोदी सरकारवर केला आहे. आपला निषेध नोंदवण्यासाठी काँग्रेसनं दिल्लीत शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. मात्र या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्यामुळे कारवाई करत काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. 

राहुल गांधींसोबत शक्तीप्रदर्शन

राहुल गांधी हे बहीण प्रियंका गांधींसह सकाळी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे देशभरातील अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस मुख्यालयापासून ईडी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा काँग्रेसचा प्लॅन होता. मात्र त्या दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

या नेत्यांना घेतलं ताब्यात

काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करणाऱ्या अधीर रंजन चौधरी, केसी वेणूगोपाल, दिपिंदर हुडा आणि जयराम रमेश यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे चारही खासदार मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत असल्याचं आढळल्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केसी वेणूगोपाल यांनी तब्येत सध्या बरी नसून त्यांना तुघलक रोड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. काँग्रेस नेत्या रजनी पटेल, अखिलेश प्रसाद सिंग, एल. हनुमंथय्या या नेत्यानाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय पक्षाचे अनेक कार्यकर्ते मुख्यालयाजवळ आंदोलन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सत्याग्रह मार्च

पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आमचा सत्याग्रह मार्च सुरूच राहिल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सूरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केली होती. राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणांनी काँग्रेस भवनाचा परिसर कार्यकर्त्यांनी दुमदुमून सोडला. चौकशीत काहीही न आढळल्याने ज्या नॅशनल हेराल्ड प्रकऱणाची फाईल बंद करण्यात आली होती, ती मोदी सरकारने जाणीवपूर्वक पुन्हा बाहेर काढली असल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. 

अधिक वाचा - पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई

काय आहे प्रकरण?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संलग्न असणारे हे वृत्तपत्र 2008 सालापर्यंत काँग्रेसशी संलग्न होते. 1 एप्रिल 2008 साली हे वृत्तपत्र तात्पुरते बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. 2009 मध्ये हे वृत्तपत्र कायमचे बंद करण्यात येत असल्याची घोषणा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधींनी केली. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक फेरफार झाल्याची तक्रार केली होती. या वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या संस्थेकडे होती. या संस्थेकडून यंग इंडिया लिमिटेड या संस्थेने वृत्तपत्राचा ताबा घेतला. या संस्थेत सोनिया गांधी व राहुल गांधी यांची प्रत्येकी 38 टक्के मालकी आहे. या व्यवहार 90 कोटी रुपयांना झाला. वास्तविक, हजारो कोटींची मालमत्ता असलेल्या या वृतपत्राचा व्यवहार केवळ 90 कोटीत झाल्याला आक्षेप घेत सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी