निवडणुकीच्या तोंडावर पुदुचेरीत काँग्रेस सरकार पडलं

पुदुचेरी विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. पण कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम चार महिने उरले असताना पुदुचेरीत अस्थिरता निर्माण झाली. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले

Congress Loses Power In Puducherry, V Narayanasamy Resigns
निवडणुकीच्या तोंडावर पुदुचेरीत काँग्रेस सरकार पडलं 

थोडं पण कामाचं

  • निवडणुकीच्या तोंडावर पुदुचेरीत काँग्रेस सरकार पडलं
  • बहुमत सिद्ध करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांचा सभात्याग
  • सत्ताधारी गटातील सहा आमदारांचा राजीनामा

नवी दिल्ली: पुदुचेरी विधानसभेचा कार्यकाळ २१ जून २०२१ रोजी संपणार आहे. पण कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम चार महिने उरले असताना पुदुचेरीत अस्थिरता निर्माण झाली. मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आणि काँग्रेसचे सरकार पडले. नारायणसामी यांनी पदाचा राजीनामा दिला. (Congress Loses Power In Puducherry, V Narayanasamy Resigns)

काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि द्रमुकच्या एका आमदाराने राजीनामा सादर केला. याआधी एका आमदाराला विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. यामुळे नारायणसामी सरकार अल्पमतात गेले. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी सांगितल्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव सादर केला. पण मतदान होण्याआधीच स्वतःचे भाषण संपवून मुख्यमंत्री नारायणसामी आणि सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. याउलट विरोधक सभागृहातच थांबले. अखेर केंद्र सरकारचे विधानसभेतील प्रतोद (व्हिप) आर. के. आर अनंथरमण यांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे जाहीर केले. यानंतर नारायणसामी यांनी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला.

याआधी विधानसभाध्यक्षांनी एका आमदाराला अपात्र ठरवले होते तर काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या चौथ्या आमदाराच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांना निवेदन देऊन नारायणसामी सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. अखेर आज (सोमवार, २२ फेब्रुवारी २०२१) विधानसभेत मुख्यमंत्री नारायणसामी यांनी विश्वासदर्शक ठराव सादर केला. या ठरावावर मतदान होण्याआधीच मुख्यमंत्री नारायणसामी आणि सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला.

काही दिवसांपूर्वी ए. नमः शिवायम आणि ई. थिपय्यींजन या दोन काँग्रेस आमदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. तर मल्लडी कृष्ण राव यांनी मागच्या सोमवारी (१५ फेब्रुवारी) आणि ए. जॉन कुमार यांनी मंगळवारी (१६ फेब्रुवारी) राजीनामा सादर केला. एका आमदाराला आधीच अपात्र जाहीर करण्यात आले होते. यामुळे विधानसभेचे चित्र बदलले.

काँग्रेसच्या चार आमदारांचे राजीनामे सादर झाल्यानंतर राष्ट्रपतींनी नायब राज्यपाल किरण बेदी यांना माघारी बोलावले. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींची भेट घेऊन नायब राज्यपालांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यामुळे किरण बेदी यांना माघारी बोलावण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर झाल्याचे समजून काँग्रेसने निर्णयाचे स्वागत केले. मात्र काही तासांच्या आतच त्यांना बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज आला. राष्ट्रपती कार्यालयाने एक पत्रक काढून तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांच्याकडे पुदुचेरीचा अतिरिक्त कार्यभार सोपवला. विरोधकांनी राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांची भेट घेतली आणि त्यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले. हे निवेदन मिळाल्यानंतर कायदेशीर तरतुदीनुसार राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी मुख्यमंत्री नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते.

विश्वासदर्शक ठरावावर मतदान होण्याआधी आणखी दोन आमदारांचे राजीनामे सादर झाले. यात काँग्रेसच्या एका (के. लक्ष्मीनारायणन) तर द्रमुकच्या एका (के. वेंकटेसन) आमदाराचा समावेश होता. यामुळे सत्ताधारी गटाला परिस्थिती आपल्या हाताबाहेर असल्याचे लक्षात आले. 

बहुमत सिद्ध करणे कठीण असल्याची जाणीव होताच मुख्यमंत्री नारायणसामी यांनी जनहिताच्या योजना राबवल्या आणि जवळपास पाच वर्ष सरकार चालवले, असे सांगितले. केंद्र सरकारमुळेच पुदुचेरीत अस्थिरता निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. याआधी त्यांनी नायब राज्यपाल किरण बेदी यांना माघारी बोलावण्याच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तसेच आपले सरकार बहुमत सहज सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त केला होता. पण बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी त्यांचा दावा फोल ठरला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी