मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी द्या, काँग्रेस आमदाराची मागणी

लोकल ते ग्लोबल
Updated May 14, 2020 | 15:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

ईद निमित्त मुस्लिमांना मोकळ्या मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सी. एम. इब्राहिम यांनी केली

congress mlc demand permission for eid prayers
मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी द्या, काँग्रेस आमदार  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • ईद निमित्त मुस्लिमांना मोकळ्या मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी
  • काँग्रेसच्या आमदाराची मागणी
  • कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली मागणी

बंगळुरू: ईद निमित्त मुस्लिमांना मोकळ्या मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सी. एम. इब्राहिम यांनी केली आहे. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. हा संसर्ग वेगाने वाढू नये म्हणून देशातील गर्दीच्या ठिकाणचे कामकाज बंद करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेची सामान्य वाहतूक बंद करण्यात आली आहे. मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल, रेस्टॉरंट, बार बंद करण्यात आले आहेत. गर्दी टाळण्यासाठीच देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहेत. या निर्णयांची माहिती असूनही काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सी. एम. इब्राहिम यांनी मोकळ्या मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी मागितली आहे.

धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाता येत नाही. त्यामुळे ईद निमित्त पहाटे पासून दुपारपर्यंतचे नमाज अदा करण्यासाठी मोकळ्या मैदानात नागरिकांना जाऊ द्यावे, असे इब्राहिम यांचे म्हणणे आहे. ईद निमित्त मुस्लिम श्रद्धाळू विशेष नमाज अदा करतात. ही बाब लक्षात घेऊन वैद्यकीय सल्ला घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोकळ्या मैदानात नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी इब्राहिम यांच्या मागणीबाबत अद्याप कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र या पत्राच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोरोना संकटात अपवाद करावे की करू नये यावरुन चर्चेला तोंड फुटले आहे.

तबलिगी जमात प्रकरण

दिल्लीत  १३ मार्चला निझामुद्दीन येथे मरकज (धार्मिक विषयाचे मार्गदर्शनपर सत्र) सुरू झाली. तबलिगी जमात नियमितपणे बंदीस्त इमारतीत या मरकजचे अनेक वर्षांपासून आयोजन करते. त्यामुळे या कार्यक्रमासाठी वेगळी परवानगी मागण्यात आली नव्हती. लॉकडाऊन जाहीर झाले त्यावेळी मरकजमध्ये सहभागी काही नागरिक आजारी आहेत अशी मोघम माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. कोरोना थोपवण्यासाठी लॉकडाऊन सुरू केल्यामुळे पोलिसांनी तबलिगी जमातच्या आजारी सदस्यांना पुढे येण्याचे आणि रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन केले. पण तबलिगी सदस्य ऐकत नव्हते. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी पोलीस ताफा तैनात असल्यामुळे तबलिगींना शांततेने बाहेर येण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही आणि मौलान साद गायब असल्याचे कळले. जमातचे काही सदस्य लॉकडाऊन जाहीर होण्याआधी दिल्लीतून निघून गेले आहेत आणि त्यात काही आजारी आहेत, अशी नवी माहिती मिळाली. श्रीनगरमध्ये तबलिगी जमातच्या एका सदस्याचा मृत्यू झाला. या घडामोडींमुळे पोलिसांनी ३० मार्चला इमारतीमधून सर्व तबलिगींना बाहेर काढण्याचा आणि क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर देशातील सर्वच्या सर्व धार्मिक स्थळांना बंद ठेवून गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने मोठ्या प्रमाणावर सुरू केले. नागरिकांचाही कोरोना संकट टाळण्यासाठी या आवाहनाचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रात मंदिरांच्या सोन्यावरुन वाद

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक नवी मागणी केली आहे. सरकारने मंदिरांचे सोने परतीच्या बोलीवर ताब्यात घेऊन त्यावर मंदिर व्यवस्थापनाला १ किंवा २ टक्के दराने व्याज द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. चव्हाणांच्या या मागणीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. 'काँग्रेसचा डोळा फक्त मंदिरांच्या पैशांवर आहे, त्यांना मशिदी किंवा चर्च कधीच दिसत नाहीत', अशी प्रतिक्रिया महंत कमल नयन दास यांनी दिली. तर देशासाठी जप्ती करायची असेल तर आधी काँग्रेस नेत्यांची संपत्ती का जप्त करू नये, असा सवाल स्‍वामी परमहंस यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी