Lalit Modi Surprize : ललित मोदींनी केलं होतं आईच्या मैत्रिणीशी लग्न, वडिलांनाही दिला होता मोठा धक्का, वाचा सविस्तर

सातत्यानं चर्चेत राहणाऱ्या ललित मोदींना आश्चर्याचे धक्के देण्याची जणू सवयच आहे. आईच्या मैत्रिणीसोबत केलेल्या लग्नापासून ते सुष्मिता सेनसोबतच्या डेटिंगपर्यंतचे काही किस्से.

Lalit Modi Surprize
ललित मोदींनी केलं होतं आपल्या आईच्या मैत्रिणीशी लग्न  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • ललित मोदींना सरप्राईज देण्याची सवय
  • आईच्या मैत्रिणीसोबत केलं होतं लग्न
  • सुषमा स्वराज यांनाही दिला होता धक्का

Lalit Modi Surprize : ललित मोदी यांनी सुश्मिता सेनसोबत आपण डेट करत असल्याचं जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र अशा प्रकारचे धक्के देण्याची त्यांची सवय जुनी आहे. आयुष्यात पहिल्यांदा खरेदी केलेल्या कारपासून ते आयपीएल घोटाळ्यापर्यंत अनेक बाबतीत ते अनेकांना धक्के देत आले आहेत. जाणून घेऊया, या धक्क्यांचा इतिहास.

श्रीमंत कुटुंबात जन्म

ललित मोदी यांचे आजोबा गुजरमल मोदी हे व्यापारी होते. त्यांनी मोदी ग्रुपची सुरुवात केली आणि त्यानंतर मोदीनगर नावाचं शहर वसवलं होतं. ललित मोदी यांचे वडील कृष्णकुमार मोदी हे  उद्योगपती होते. त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं मूल असं ललित यांचं वर्णन करण्यात येतं. ललित यांचं माध्यमिक शिक्षण शिमल्यातील बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना अमेरिकेत पाठवण्यात आलं. 

पहिल्या कारच्या खरेदीमुळे धक्का

अमेरिकेत गेल्यावर आपल्याला कारसाठी पैसे हवे असल्याचं त्यांनी वडिलांना सांगितलं. वडिलांनी काही हजार रुपये पाठवले आणि सेंकड हँड कार घ्यायला सांगितलं. मात्र ललित मोदींनी त्या पैशांचं डाऊनपेमेंट करून अलिशान मर्सिडीज कार हफ्त्यांवर म्हणजे ईएमआयवर खरेदी केली. हे समजल्यावर त्यांच्या वडिलांना धक्का बसला. तोपर्यंत मोदी खानदानात कुणीही कर्जावर कार घेतली नव्हती. 

अधिक वाचा - Modi सरकारचा नवीन फर्मान, असंसदीय शब्दानंतर संसदेच्या आवारात निदर्शने करण्यावर बंदी, पाहा काय आहे नवा आदेश

कोकेन घेतल्याचा आरोप

अमेरिकेत असताना त्यांना कोकेनसह रंगेहाथ अटक करण्यात आली होती. मात्र मोदी कुटुंबीयांनी आपला प्रभाव वापरत हे प्रकरण मिटवल्याची चर्चा होती. 

आईच्या मैत्रिणीशी लग्न

शिक्षण संपवून ललित मोदी भारतात आले. मग त्यांची ओळख मीनल सग्रानी यांच्याशी झाली. मीनल ही त्यांच्या आईची घट्ट मैत्रीण. आईला भेटायला ती सतत घरी येत असे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता. या काळात ललित मोदी आणि मीनल यांचं सूत जुळत गेलं आणि दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आईसाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. ललित मोदी यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. त्यामुळे त्यांनी ललित यांना घरातून हाकलून दिलं. मात्र वडिलांकडून त्यांना खर्चाचे पैसे मिळत होते. 

सिगरेट कंपनीचे डायरेक्टर

वर्षभरात हे प्रकरण थंड झालं आणि ललित मोदी पुन्हा व्यापाराला लागले. अमेरिकेची सिगरेट बनवणारी कंपनी गॉडफ्रे फिलिफ्सचे भारतातील एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनले. 

अधिक वाचा - रात्री उशिरा अश्लील चॅटिंग करणाऱ्या पतीचा चार्जर केबलने आवळला गळा

मोदी एंटरटेनमेंट नेटवर्क

1993 साली ललित मोदींनी मोदी एंटरटेनमेंट नेटवर्कची सुरुवात केली. वॉलडिसने आणि फॅशन टीव्हीसोबत त्यांनी 10 वर्षांचा करार केला. त्याच काळात ललित मोदींची नजर ईएसपीएन या चॅनलवर पडली. भारतातील अनेक क्रिकेट सामन्यांचं प्रसारण या वाहिनीवरून केलं जात होतं. या नेटवर्कचे व्यवहार नीट समजून घेतल्यावर त्यांच्या लक्षात आलं की भारतीय क्रिकेटच्या प्रसारणात कोट्यवधी रुपये गुंतलेले आहेत. तेव्हापासूनच आयपीएलची कल्पना त्यांच्या डोक्यात घोळायला सुुरुवात झाली. 

आयपीएलची तयारी

क्रिकेटशी संबंधित संस्थांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय ललित मोदींनी घेतला. त्यानंतर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मग पंजाब क्रिकेट असोसिएशन आणि मग राजस्थान क्रिकेट असोसिएशनमध्ये ते सहभागी झाले. राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष होतील, याची कुणी कल्पनाही केली नसेल. मात्र 2005 साली हे प्रत्यक्षात घडलं. त्यानंतर आयपीएलची कल्पना घेऊन ते तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडे गेले. मात्र त्यांना ही कल्पना फारशी रुचली नाही. त्यानंतर हीच कल्पना त्यांनी शरद पवारांकडे मांडली. पवारांना ही कल्पना भलतीच आवडली. त्यानंतर जगमोहन दालमियांना पराभूत करून जेव्हा पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष झाले, तेव्हा आयपीएलची कल्पना प्रत्यक्ष साकारायला सुरुवात झाली. 

अधिक वाचा - Breaking News 16 July 2022 Latest Update: औरंगाबाद झाले छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद झाले धाराशिव

आयपीएलला मूर्त स्वरूप

2008 साली त्यांना आयपीएलला मूर्त स्वरूप देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि आयपीएलचे पहिले अध्यक्ष बनले. मोठमोठे लोक यात पैसे गुंतवायला तयार होते आणि फ्रँचायझी विकत घेण्यासाठी कोट्यवधींची बोली लावली जात होती. आयपीएलच्या प्रसारणासाठीदेखील बीसीसीआयला ललित मोदींनी कोट्यवधी रुपये मिळवून दिले आणि ते बीसीसीआयमधील एक व्हीआयपी व्यक्ती म्हणून समोर आले. 

चार्टर्ड विमानातून ऐश

आयपीएलचे चेअरमन असताना ललित मोदींनी स्वतःसाठी एक चार्टर्ड विमान ठेवलं होतं आणि त्यातून ते वारंवार प्रवास करत होते. या विमानाचं दर तासाचं भाडं 3 लाखांपेक्षाही जास्त होतं. हे विमान आहे की टॅक्सी, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र ललित मोदींसाठी ते सुगीचे दिवस होते. त्यानंतर मात्र आयपीएल घोटाळा समोर आला आणि ललित मोदी गायब झाले.

अधिक वाचा - पावसाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये घेतली विश्रांती, पण सहा राज्यांवर अस्मानी संकट

सुषमा स्वराज यांनाही धक्का

भारतातून फरार झालेले ललित मोदी यांना ब्रिटनवरून पोर्तुगालला जाण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. मात्र त्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. 

सुष्मिता सेनसोबत अफेअर

त्यानंतर चर्चेतून बाहेर गेलेले ललित मोदी आता सुष्मिता सेनसोबतच्या अफेअरमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी